सरहद मधील १५०० विद्यार्थिनी २१ सप्टेंबर रोजी करणार विक्रम : इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार नोंद
पुणे : कात्रज येथील सरहद कॉलेजमधील १५०० विद्यार्थिनी एकाच दिवशी तब्बल १० हजार कोरफड रोपांची लागवड करून विक्रम करणार आहेत. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरफड ही वनस्पती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचे औचित्य साधून सरहद महाविद्यालयाच्या वतीने शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सरहद महाविद्यालय कात्रज येथे हा उपक्रम होणार आहे, अशी माहिती सरहद महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.संगीता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना चव्हाण इंग्लिश विभागाच्या प्रमुख डॉ. अनुपमा वाटकर, वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ. वर्षा निंबाळकर उपस्थित होते. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये यांची नोंद होण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत.
संगीता शिंदे म्हणाल्या, पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण पूरक अशा कुंडीमध्ये कोरफडीचे रोप लावण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थिनी हे रोप घेऊन आपल्या आजूबाजूच्या परिसरात, घरी सोसायटीमध्ये लावणार आहेत.
कोरफड वनस्पतीची वाढ ही सावलीत, कमी पाण्यात देखील होते आणि त्याची देखभाल दररोज करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे याची लागवड आणि निगा राखणे हे तुलनेने सोपे आहे त्यामुळे कोरफड रोपाची निवड करण्यात आली आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने कोरफडीची लागवड करण्यात येत आहे.
कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे जी वेगवेगळ्या आजारांवर औषध म्हणून वापरली जाते. कोरफड तशी दिसायला लहान असली तरी औषधी उपयोगाच्या दृष्टिने फार महत्वाची आहे. हवा शुद्ध करण्याचे काम कोरफड करते. महिलांसाठी मासिक पाळीच्या त्रासामध्ये ही वनस्पती अत्यंत उपयोगी ठरते. यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई सह कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे या बहुगुणी रोपाची निवड लागवडीसाठी करण्यात आली.