स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ
मुंबई-सकाळी होणारे प्रदूषण कमी व्हायला पाहिजे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः सहभाग घेत स्वच्छता केली. इतकेच नाही तर कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर देखील त्यांनी चालवणे. यात गिरगाव चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेत देखील एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची रोज सकाळी होणारी पत्रकार परिषद सत्ताधारी पक्षांकडून नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. यावरून त्यांना अनेकदा विरोधी पक्षांनी टोला देखील लगावला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सकाळी होणारे हे प्रदूषण आता कमी व्हायला हवे, असे म्हणत त्यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे.