सहजीवन गणेश मित्र मंडळ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी, हिंदी गीतांचे सादरीकरण
पुणे : प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर आणि सुप्रसिद्ध पार्श्वगायक राजेश दातार यांनी सादर केलेल्या सदाबहार मराठी, हिंदी चित्रपट गीतांनी रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली.
निमित्त होते सहकारनगर क्र. दोनमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे. चित्रपट अन् चित्रपट गीतांसंदर्भातील विविध किस्से आणि गीतांचे सादरीकरण असा गीतांचा फुलोरा ठरलेला ‘नमस्ते बॉलीवुड’ हा अनोखा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘हृदयाच्या तालावर नाचे गणेशु’ या गीताने झाली. ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘गोमु संगतीनं माझ्या तू..’, ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘मैने तेरे लिये..’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘पिया तोसे नैना लागे रे’, ‘मधुबन मे राधिका नाचे रे’, ‘दिवाना हुआ बादल’, ‘निले निले अंबर पर’, ‘होश वालो को खबर क्या’, ‘काटा लगा’, ‘पहेला नशा पहेला खुमार’, ‘खैके पान बनारसवाला’, ‘यारा सिली सिली’, ‘दर्दे दिल’, ‘लागा चुनरी मे दाग’ आदी गीते तसेच ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ ही गझल सादर करण्यात आली. कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत वाद्यांच्या ठेक्यावर तालही धरला.
केदार परांजपे, (सिंथेसायझर), प्रसन्न बाम (संवादिनी), अभिजित जायदे (तबला), विनोद सोनावणे (ऑक्टोपॅड) यांनी समर्पक साथसंगत करीत कार्यक्रमात रंगत आणली. शिल्पा देशपांडे यांनी चित्रपट, चित्रपट गीतांविषयी विविध किस्से सांगत कार्यक्रमात रंग भरले.
श्रीनाथ भिमाले, अश्विनी कदम, अविनाश सुर्वे यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती.
कलाकार आणि मान्यवरांचा सत्कार सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील, उत्सव समितीचे प्रमुख विनय कुलकर्णी, डॉ. स्नेहल तावरे, डॉ. लालसिंग तावरे, अर्चना जोशी, श्रुती नाझिरकर, विजय ममदापूरकर, अमित शहाणे यांच्या हस्ते करण्यात आला.