पुणे- सीआरपीएफ जवानाच्या खासगी बंदुकीतून टोळक्याने केलेल्या गोळीबारात एकाची हत्या झाल्याप्रकरणी 14 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सीआरपीएफ जवानावरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.अशी माहिती ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी येथे दिली
हवेली पाेलिस स्टेशनच्या हद्दीत सिंहगड गावाचे परिसरात घेरा, सांबरेवाडी याठिकाणी 14 सप्टेंबर राेजी मध्यरात्री 1 च्या सुमारास राेहिल ऊर्फ भाेऱ्या ढिले व तेजस वाघ ( दाेघे रा. खानापूर, पुणे) यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या किरकाेळ भांडणाचे कारणाचा राग मनात धरुन तेजस वाघ व त्याच्या साथीदारांनी गोळीबार व धारदार शस्त्राने वार केला होता. त्यात राेहित ढिले याचा मृत्यू हाेऊन त्याचा साथीदार साेमनाथ वाघ दाेन गाेळ्या लागल्यामुळे जखमी झाला हाेता. या प्रकरणात 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेषतः आराेपींनी सीआरपीएफच्या जवानाच्या खासगी बंदुकीचा वापर करत गाेळीबार केल्याची बाब उघडकीस आल्याने सीआरपीएफ जवानास देखील अटक करण्यात आली आहे.
मंगेश ऊर्फ मुन्ना माेहन दारवटकर (वय-25,रा.काेंडगाव, पुणे), वैभव शिवाजी जागडे (20,रा.वेल्हा,पुणे), सिध्देश राजेंद्र पासलकर (25,रा.आंबेड, पुणे), प्रथमेश मारुती जावळकर (18), सुमीत किरण सपकाळ (20), केतन नारायण जावळकर (23), वैभव किशाेर पवार (18), तेजस चंद्रकांत वाघ (24), गणेश अंकुश जावळकर (23), आकाश अनंता वाघ (27, सर्व रा.खानापूर, पुणे), वरुण रामदास दारवटकर (36,रा.आंबेड,पुणे), माेहन सबाजी चाेर (52,रा.तळेगाव दाभाडे,पुणे), विकास विलास नारगे (26,रा.सांबरेवाडी, पुणे) व साकहिल बाळु काेंडके (21,रा.सांबरेवाडी,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पाेलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, राेहित ढिले याने तेज वाघ यास काही दिवसांपूर्वी फाेनवरुन शिवीगाळ करत तुझ्यात दम असेल तर खानापूर चाैकात ये असे आव्हान दिले होते. त्याप्रमाणे तेजस वाघ हा आपल्या मित्रांसह खानापूर येथे गेला हाेता. तिथे राेहित ढिले व त्याचा मित्र यश जावळकर, विकास नारगे, साहिल काेंडके, चेतन जावळकर, प्रविण सांबरे यांनी साेमनाथ अनंता वाघ, तसेच चंद्रकांत वाघ यांना मारहाण केली होती. यावेळी चेतन जावळकर याने त्याच्याकडील बंदुकीतून साेमनाथ वाघ याच्यावर फायरींग करुन त्याचा खूनाचा प्रयत्न केला.
आराेपींनी घटनेच्या दिवशी बेकायदेशीर गर्दी जमवून बंदुकीने हवेत फायर करुन राेहित ढिले याच्यावर लाेखंडी राॅड, काेयता व घातक हत्याराने हल्ला केला. त्यानंतर कार व दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. या गंभीर गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याची सूचना पाेलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पाेलिस अधीक्षक रमेश चाेपडे यांनी एलसीबी पथक व हवेली पाेलिसांना दिल्या हाेत्या. त्यानुसार आराेपींचा माग काढून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरुन जेरबंद करण्यात आले आहे.