कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सैन्य दलातील अधिकाऱ्यांची धान्यतुला
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ तर्फे आयोजन
पुणे: नागरिक नेहमीच भारतीय सैनिकांच्या मागे उभे राहतात त्याबद्दल मला गर्व आणि अभिमान वाटतो. नागरिक जेव्हा कौतुक करतात तेव्हा सैनिकांना स्फूर्ती मिळते, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) यांनी केले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्या वतीने कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘कथा प्रेरणेची गौरव गाथा विजयाची’ हा जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात मंडळातर्फे दहा दिवस दहा उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत भारतीय सैनिकांप्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैन्य दलातील पाच अधिकाऱ्यांची धान्य तुला करण्यात आली. यावेळी निंभोरकर आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते सैनिकांचा सन्मान करण्यात आला. उद्योजक सारंग पासकंटी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, पराग ठाकूर, शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, रोहन जाधव, वैभव वाघ, योगेश पासलकर खजिनदार अमर लांडे, विक्रांत मोहिते, सचिन सासने, उमेश कांबळे, यावेळी उपस्थित होते.
नायब सुभेदार विलास दामगुडे, नायब सुभेदार रामधन मिरगे, नायब सुभेदार दत्ता मोझर, बी.व्ही. गुरव, बजरंग निंबाळकर यांचा सन्मान आणि धान्य तुला करण्यात आली. आपले घर, लुई ब्रेल अपंग कल्याण संस्था, बचपन वर्ल्ड फोरम, संतुलन पाषाण, सेवाधाम या संस्थांना धान्य देण्यात आले.
राजेंद्र निंभोरकर म्हणाले, मी मेजर जनरल म्हणून काश्मीर खोऱ्यात आतंकवादाचा सामना करण्यासाठी इन्चार्ज होतो. तेव्हा २०१२ साली तिथे गणपतीची स्थापना केली आणि झेलम च्या तीरावर विसर्जन देखील केले. त्यावेळी अनेकांनी तिथे मुस्लिम आहेत काहीतरी विरोध होईल असे सांगितले, परंतु आपण आपला धर्म का सोडायचा आपल्या देशात सर्व धर्म समभाव आहे आपल्या देशात जर धर्म पाळला नाही तर कुठेही पाळू शकत नाही.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, कारगिल विजय दिन आणि कारगिल स्मारक या देखाव्याच्या माध्यमातून देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले अशा शूरवीर सैनिकांचा सन्मान करण्यात आला आहे, आगळ्यावेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा मंडळांनी जपली आहे.
आनंद सराफ म्हणाले, सैनिक हे मातृभूमीचे सच्चे सेवक असतात. भारत मातेची सेवा केल्यानंतर पदक त्यांच्या छातीवर विराजमान होतात, अशा पाच प्रातिनिधिक वीरांचा फुलांच्या तराजूमध्ये सन्मान करण्यात आला. अनेक चांगले उपक्रम सेवा मित्र मंडळाचे कार्यकर्ते राबवत असतात. सार्वजनिक उत्सवाला सामाजिक कार्याची साथ मंडळाच्या वतीने देण्यात येते. विक्रांत मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.