21 कलाकारांचा गायनसेवेतून श्री गणेशाला स्वराभिषेक
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांची उपस्थिती
पुणे : अभंग, भक्तीगीते, भावगीते, हिंदी-मराठी चित्रपटांमधील सुप्रसिद्ध गीतांद्वारे पुण्यातील 21 कलाकारांनी श्री गणेशाला स्वराभिषेक केला. कलाकरांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत अन् सुरात सूर मिसळत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सहकारनगर क्र. दोनमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध आणि नवोदित कलाकारांनी गायनसेवा सादर केली. ‘माझे माहेर पंढरी’, ‘भाग्यदा लक्ष्मी’, ‘कमोदिनी काय जाणितो’, ‘आज कुणी तरी यावे’, ‘मी राधिका मी प्रेमिका’, ‘मोगरा फुलला’, ‘दिल का हाल सुने दिलवाला’, ‘मी वाऱ्याच्या वेगाने आले’, ‘रुपेरी वाळूत’, ‘बदन पे सितारे लपेटे हुएं’, ‘ऐ री पवन’, ‘तुमको पिया दिल दिया’, ‘झुमका गीरा रे’, ‘रुक जा रात ठेहेर जा रे चंदा’, ‘तेरे मेरे बिचमे’, ‘कागज के दो पंख लिए’, ‘नैंनोमें बदरा छाए’, ‘मोहे रंग दो लाल’, ‘आईए मेहेरबां’ आदी गीते सादर करण्यात आली. रुपेरी पडद्यावरील मराठी-हिंदी गीतांद्वारे रसिकांनी चित्रपट गीतांचा सुवर्णकाळ अनुभवला.
प्रमोद रानडे, गफार मोमीन, दत्ता थिटे, जितेंद्र भुरुक, चैत्राली अत्रे, श्रुती देवस्थळी, ऋचा महामुनी, भाग्यश्री अभ्यंकर, तन्वी अभ्यंकर, प्राजक्ता आपटे, निवेदिता सहा, अस्मिता मुखर्जी, विवेक पांड्ये, अनघा नवरे, सारंग कुलकर्णी, रुचिरा गुरव, मृदुला मोघे, संपदा वाळवेकर, भाग्यश्री गोसावी, मंजिरी रणदिवे आदी कलाकारांनी गीते सादर केली. योगेश सुपेकर यांनी मिमिक्रीद्वारे कलावंत, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या आवाजातून विविध किस्से सादर केले.
विवेक परांजपे, केदार परांजपे, (सिंथेसायझर), प्रसन्न बाब (संवादिनी), अभिजित जायदे (तबला) यांनी साथसंगत केली.
सहकारनगरमधील माजी नगरसेवक आबा बागूल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी श्रींचे दर्शन घेतले. सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित उपक्रमांचे कौतुक करून आबा बागुल म्हणाले, विविध कार्यक्रमांद्वारे सहकारनगर परिसराला सांस्कृतिक चेहरा मिळाला आहे. गुलाल आणि डीजेचा वापर न करता उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मंडळ सुसंस्कारीत पिढी घडवित आहेत. नंदकुमार गायकवाड यांनी सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले.
समीर सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी तालपरिक्रमा हा कार्यक्रम सादर केला. शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच हिंदी चित्रपट गीतांमध्ये तबला, बासरी, सतार, जेंबे आदी वाद्यांचा वापर केला जातो. अशा विविध वाद्यांच्या सादरीकरणातून एकताल, तीनताल, दादरा, रुपक, केरवा, अद्धा, दीपचंदी यांचे सादरीकरण करण्यात आले. आकाश मोरे, वेदांग ठोंबरे, स्वप्निल दीक्षित, आकाश निमसाखरे, आदित्य देशपांडे, अझरुद्दिन शेख, गणेश बोज्जी, आलाप श्रीवास्तव आदींनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश दातार यांनी केले.
कलाकार आणि मान्यवरांचा सत्कार सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील, उत्सव समितीचे प्रमुख विनय कुलकर्णी, पंडित अतुलकुमार उपाध्ये, अमर दबडे, मंदार मोघे, सुयश साबडे, निखिल शिरगावकर, अभिजित वेरेकर, प्रिती जावडेकर, जगदिश यादव, राजेश दातार, अर्चना जोशी, स्मीता पाटील, अमित शहाणे, शंतनू शर्मा यांनी केला. निवेदन प्राजक्ता मांडके यांनी केले.