मुंबई-त्यांनी ईडी म्हटलं म्हणून मी सीडी म्हटलं होतं. मी यमक जुळवलं होतं. त्या ओघात मी बोललो. पण माझ्याकडे काही कागदपत्रं, क्लिप होत्या, असा धक्कादायक गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात केला. ‘माझ्या मोबाईलमध्ये भाजपच्याच एका बड्या नेत्याची अश्लील क्लिप होती. पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना मी ती क्लिप दाखवली होती. मुलीसोबत काय चाळे चालेल आहेत ते बघा, असं वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं,’ असं खडसे म्हणाले.
एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना ऑक्टोबर २०२० मध्ये म्हटलं होते. त्यानंतर खडसे राष्ट्रवादीचे आमदार झाले. पण लोकसभेच्याआधी त्यांनी घरवापसीचा निर्णय घेतला. पण भाजपनं त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली नाही. त्यामुळे खडसे नेमके कुठे आहेत, असा प्रश्न विचारला जातो. खडसेंनी उल्लेख केलेल्या सीडीचं काय झालं, हा प्रश्नदेखील अनुत्तरित राहिला. पण आता दस्तुरखुद्द खडसेंनीच या प्रश्नांची उत्तरं दिलीआहेत.
मुलीशी अश्लील चाळे करणारा तो नेता कोण, असा प्रश्न खडसेंना विचारण्यात आला. त्यावर खडसेंनी त्या नेत्याचं नाव घेणं टाळलं. कोण चाळे करत होतं, त्याचं नाव आता सांगत नाही. तुम्हाला माहीत असलेल्या नेत्यांपैकीच एकाची ती क्लिप होती, असं खडसेंनी सांगितलं.माझ्याकडे त्या नेत्याची अश्लील क्लिप होती. पण नंतर ती क्लिप माझ्या मोबाईलमधून कशी काय डिलीट झाली, काही कल्पना नाही, असं खडसे म्हणाले. मुक्ताईवर माझी श्रद्धा आहे. मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो, माझ्याकडे क्लिप होती. पण ती क्लिप कशी डिलीट झाली, ते माहीत नाही. भाजपमधील वरिष्ठांना, दिल्लीतील वरिष्ठांना मी ती क्लिप दाखवली होती. त्यांनी ती पाहिली होती, असं खडसेंनी पुढे म्हटलं.तुमच्याकडे असलेली क्लिप डिलीट झाली. पण ज्यानं तुम्हाला ती दिली, त्याच्याकडे तर ती असेल ना, असा प्रश्न खडसेंना विचारण्यात आला. त्यावर ज्यानं मला क्लिप दिली, त्याला त्यांनी मॅनेज करुन टाकलं. फ्लॅट, पाच कोटी, दहा कोटी, काय दिलंय ते माहीत नाही. आता तो माणूस त्यांच्याकडे आहे. आता त्याची जवळपास २० ते २५ कोटींचा मालमत्ता आहे, असं खडसेंनी सांगितलं.