– दुर्मिळ प्रकरणात न्यायालयाने सुनावली जामीनदारालाच शिक्षा
– गुंतवणूक साठी दिलेले पाच लाख परत न केल्याने ठोठावला कारावास व दंड
पुणे : गुंतवणुकीतून परतावा मिळावा यासाठी दिलेले पाच लाख रुपये तीन महिन्याच्या मुदतीनंतर परत दिले नाहीत. तसेच त्या पैशाला तारण म्हणून जामीनदाराने दिलेले चेकही बाऊन्स झाले. या प्रकरणात न्यायालयाने मुलाच्या पैशासाठी जामीनदार राहिलेल्या पित्याला 5 लाखाला अठरा टक्के व्याजदराने महिन्याच्या आत 10 लाख भरपाई सह एक वर्षाचा कारावास सुनावला आहे. पैसे वेळेत न दिल्यास आणखी तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आर्थिक गैरव्यवाहार प्रकरणात न्यायालयाने आरोपीबरोबरच जामीनदाराला तितकेच जबाबदार धरत ही दुर्मिळ मात्र महत्वाची शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी ऍड. निखिल मलाणी यांनी विधीज्ञ नागेश आर. रणदिवे यांच्यामार्फत आरोपी रामदास बाजीराव पासलकर व त्याचा मुलगा अभिजित रामदास पासलकर (रा. विजय पार्क, सिमसागर सोसायटी, सुखसागर नगर, कात्रज) या दोघा बापलेकांविरुद्ध न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयात अपील केले होते.
ऍड. निखिल आणि आरोपी अभिजित यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अभिजित हा गुंतवणूक सल्लागार आहे. त्याने फिर्यादी निखिल यांना महिन्याला ६.५ टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवत त्यांच्याकडून 2019 मध्ये पाच लाख घेतले होते. तसेच ही रक्कम तीन महिन्यात परत देण्याचे मान्य केले. याबाबत फिर्यादी यांनी त्यांच्यासोबत समझोता करारनामा केला होता. त्यामध्ये पैशाला जामीनदार आरोपी अभिजित याचे वडील रामदास हे होते. काही महिने त्याने परतावा दिला आणि नंतर दिला नाही. वर्षभरानंतर पाच लाखही दिले नाहीत.
यावेळी फिर्यादि यांना अभिजित आणि त्याचे वडील रामदास पासलकर यांनी दिलेले चेक बाऊन्स झाले. फिर्यादी यांनी त्याचे सर्व रेकॉर्ड तयार केले. याप्रकरणी निखिल यांनी दोघा बापलेकाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात फिर्यादी यांनी सर्व कागदपत्रे सादर केली. न्यायालयाने सर्व बाबी विचारात घेता तसेच अभिलेखावर दाखल केलेली कागदपत्रे, अभिलेखावर आलेला पुरावा, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद विचारात घेता न्यायालयाने जामीनदार यांचा चेक बाऊन्स झाल्याने आदेश पारित केला आहे.
आरोपी रामदास बाजीराव पासलकर यांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २५५ (२) नुसार गुन्हा कलम १३८ पराक्रम्य संलेख अधिनियम, १८८१ नुसार दोषी मिळून आल्याने त्यांना एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीचा जामीन जप्त करण्यात येत आहे. आरोपीने फिर्यादीला फौजदारी प्रक्रिया सहिंता, १९७३ चे कलम ३५७ (३) नुसार नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपये आजपासून एक महिन्यात द्यावी. आरोपीने नुकसान भरपाई देण्यास कसूर केल्यास त्याला आणखीन तीन महिन्याचा साधा कारावयास देण्यात येत आहे असा आदेश दिला.
नुकसान भरपाईची रक्कम आरोपीने न्यायालयात जमा केल्यास अपीलाचा कालावधी संपल्यानंतर ही रक्कम फिर्यादीला देण्यात यावी. तसेच अपील दाखल झाल्यास अपीलाचा निकाल लागेपर्यंत रक्कम फिर्यादीला देण्यात येवू नये. अपील दाखल न झाल्यास फिर्यादीने दाखल केलेली सर्व मूळ कागदपत्र अपील मुदतीनंतर फिर्यादीला परत देण्यात यावीअसेही म्हटले आहे.
आरोपीला कलम ४२८ फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार आरोपीस जर चौकशी किंवा चाचणी या दरम्यान तुरुंगात असेल तर तेवढे दिवस शिक्षेतून वगळण्यात यावे, असे आदेश प्रथमवर्ग सह न्यायदंडाधिकारी, डॉ. जी. आर. डोरनलपल्ले यांनी दिले.
जामीनदारावरही तितकीच जबाबदारीआपल्याकडे पैसे बुडवणाऱ्या विरोधात शिक्षा झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र हे उदाहरण मध्ये जामीनदारही त्या पैशाला तितकाच जबाबदार असल्याचे धरत शिक्षा सूनवल्याने इतरांपेक्षा वेगळे ठरले आहे. त्यामुळे कोणालाही जामीनदार होताना नागरिकांनी मूळ व्यक्तीबरोबच त्याचीही तितकीच जबाबदारी असल्याचे न्यायालयाने या निकालाद्वारे स्पष्ट केले आहे.