राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवणारे खलनायक देवेंद्र फडणवीसच; मराठा, धनगर, आदिवासी समाजाची फडणवीसांकडून फसवणूक.
मुंबई, दि. ११ सप्टेंबर
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे खोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपाची मातृसंस्था आरएसएस मानत नाही. आरक्षणाला RSS चाच विरोध आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे अशी जाहीर वक्तव्ये केलेली आहे. त्यामुळे भाजपाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या एका विधानाची मोडतोड करुन भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. वास्तविक पाहता आरक्षणाला विरोध हा भारतीय जनता पक्षच करत आलेला आहे. “माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे, मी आरक्षण विरोधी नाही, आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मिळावे”, ही भुमिका असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. देशातील सर्व समाज घटकांना न्याय मिळावा यासाठी जातनिहाय जनगणना करावी व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवावी हीच काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची भूमिका आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे, त्यामुळे आरक्षणविरोधी कोण आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही.
राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवणारे खलनायक देवेंद्र फडणवीसच आहेत. मराठा, धनगर, आदिवासी समाजासह इतर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन देवेंद्र फडणवीस यांनी या समाजाची फसवणूक केलेली आहे. केंद्रातील भाजपा सरकारने सचिव पदावर थेट भरती करुन एकाच विशिष्ट जातीतील समाजाच्या तरुण तरुणींची थेट सचिव पदावर भरती केली होती, हा सुद्धा आरक्षण संपवण्याचाच एक प्रकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व त्यांनी दिलेल्या संविधानाचा सर्वात जास्त अपमान हा भाजपानेच केला आहे त्यामुळे आरक्षण, संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलण्याचा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना काहीही अधिकारी नाही, असे नाना पटोले म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करत बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष व चिन्हही चोरले, मोदी-शाह यांचे ते हस्तक आहेत. भाजपा जे सांगेल तेवढेच ते बोलू शकतात, त्यांनी आरक्षण व राहुल गांधी यांच्यावर बोलू नये. शिंदे यांनी आधी आरक्षणाचा अभ्यास करावा, आरएसएस, मोहन भागवत व भाजपाची आरक्षणाबद्दलच्या भूमिकेचा अभ्यास करावा व बोलावे. विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी परदेशात भारताची बदनामी करत आहेत हा आरोपही अत्यंत चुकीचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पदेशात भारताबद्दल काय काय बोलले त्याचे व्हिडीओ यु ट्यूब व सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा नीट अभ्यास करावा मग बोलावे, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला.