पुणे-
हॉटेल मालकाने जेवण नाकारल्यामुळे एका ट्रक चालकाने आपला ट्रकच हॉटेलमध्ये घुसवल्याची भयंकर घटना पुणे – सोलापूर महामार्गावरील इंदापूरच्या हिंगणगाव येथे घडली आहे. त्यात एका कारसह हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, MH 12 RN 4359 क्रमांकाचा एक कंटेनर सोलापूरहून पुण्याला जात होता. रस्त्यात भूक लागल्यामुळे चालकाने हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळवर आपला ट्रक थांबवले. त्याने हॉटेलमध्ये जावून जेवण मागितले. पण हॉटेल मालकाने रात्र झाल्यामुळे हॉटेल बंद झाल्याचे त्याला सांगितले. यावेळी त्यांच्यात जोरदार बाचाबाचीही झाली. त्यामुळे संतप्त मद्यधुंद कंटेनर चालक आपल्या ट्रकमध्ये बसला आणि त्याने ट्रक गोलाकार वळण घेऊन थेट हॉटेलमध्येच घुसवला.
हा संपूर्ण थरार एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. त्यात ट्रक चालक कशापद्धतीने हॉटेलमध्ये जोरात आपली ट्रक घुसवतो हे दिसून येत आहे. सदर हॉटेलच्या बाहेर एक कारही थांबली होती. ट्रक चालकाने त्या कारवरही आपली गाडी घातली. हा प्रकार पाहून काही व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रक चालकाला हा प्रकार थांबवण्याची विनंती केली. काहींनी त्याच्या दिशेने दगडही भिरकावले. त्यात ट्रकचेही थोडेफार नुकसान झाले. या घटनेनंतर उपस्थितांनी ट्रक चालकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांना बोलून त्याला त्यांच्या स्वाधीन केले. दरम्यान, हॉटेल मालकाने जेवण नाकारल्यामुळे आपण हे कृत्य केल्याचा कबुली ट्रक चालकाने दिल्याची माहिती आहे.