महापालिकेने तात्काळ कार्यवाही करावी : आमदार सुनिल टिंगरे यांची मागणी
पुणे :
नगर रस्त्यावरील विमाननगर चौक ते सोमनाथनगर चौक दरम्यानचा बीआरटी मार्ग काढण्याची सुचना वाहतुक पोलिसांनी महापालिकेला केली आहे. त्यावर महापालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी केली आहे.
आमदार सुनिल टिंगरे म्हणाले, नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी या मार्गावरील बीआरटी मार्ग काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पहिला टप्यात येरवडा ते विमाननगर चौक दरम्यानची बीआरटी गत वर्षा अखेर काढण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकी कोंडीत मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरीत विमाननगर चौक ते खराडीपर्यंत मार्गिका काढण्यात यावी यासाठी नुकतीच पोलिस आणि महापालिका अधिकार्यांची भेट घेऊन यासंबधीची मागणी केली. त्यावर महापालिका आयुक्तांनी याबाबत वाहतुक पोलिसांना यासंदर्भात पत्र देण्यास सांगितले. त्यानुसार वाहतुक पोलिसांनी पहिल्या टप्यात विमाननगर चौक ते सोमनाथनगर चौक या दरम्यानची बीआरटी मार्गिका वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने आणि सातत्याने अपघात होत होऊन वाहतुक कोंडी होत असल्याने हा बीआरटी मार्ग काढावा असे पत्र तत्कालीन वाहतुक पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी महापालिकेला पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुचनेनुसार तात्काळ हा बीआरटी मार्ग काढून विमाननगर चौकातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
चक्राकार वाहतुकीचे नियोजन
विमाननगर चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी विमाननगर ते सोमनाथनगर या दरम्यानचा सिग्नल काढून वर्तुळाकार वाहतुक व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी येथील तिनशे मीटर अंतराचा बीआरटी मार्ग काढण्यात यावा असेही पोलिसांनी महापालिका कळविले असल्याची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी सांगितले.