चार लाख विद्यार्थ्यांना जर्मनीत रोजगारासाठी पाठविण्याचे शासनाचे उद्दिष्ट- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
पुणे, दि. ३१: युरोपसह अनेक देशात कौशल्याधारित काम करणाऱ्या मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता असून येथील युवकांना परदेशात नोकऱ्या, रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. आज स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रामुळेही येथील युवकांना परदेशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व नॅशनल स्कील डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतन, बहिरट पाटील चौक, गोखले रस्ता, शिवाजीनगर येथे स्थापित ‘आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, एनएसडीसी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष नितीन कपूर, एनएसडीसीचे सल्लागार मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिंग कौरा आदी उपस्थित होते.
देशात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असून त्या सर्वांनाच नोकरी देण्याला मर्यादा असल्याचे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, पीढ्यान् पिढ्या शेती केल्यानंतर शेतीचे तुकडे झाल्यामुळे शेतजमीन खूप कमी झाली आहे. त्यामुळे एक जण शेतीत आणि एक जण शहरात, विदेशात नोकरीसाठी जावे लागेल. ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संस्था काढल्या परंतु चुकीच्या पद्धतीने चालवल्यामुळे त्यातीलही अनेक बंद पडल्या. त्यामुळे आता युवकांना कौशल्य देऊन, परदेशी भाषांचे शिक्षण देऊन बाहेर पाठवावे लागेल. त्यासाठी हे केंद्र चांगल्या प्रकारे काम करेल. या केंद्राच्या अनुषंगाने स्थानिक सल्लागार मंडळही बनवावे, अशी सूचनादेखील त्यांनी केली.
चार लाख विद्यार्थ्यांना जर्मनीत रोजगारासाठी पाठविण्याचे शासनाचे उद्दिष्ट- दीपक केसरकर
शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, जगाची मनुष्यबळाची मागणी पाहता महाराष्ट्र शासनाने जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी सामंजस्य करुन 31 कौशल्यांशी संबंधीत मनुष्यबळ पुरविण्याबाबत तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार युवकांना व येत्या दीड वर्षात १ लाख तर एकूण ४ लाख विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन जर्मनीत नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे उदि्दष्ट ठरविले आहे. यासाठी निवड झालेल्या युवकांना कौशल्यांचे शिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना गोएथे या संस्थेमार्फत येथील इच्छुक शिक्षकांना प्रशिक्षित करुन त्यांच्यामार्फत युवकांना जर्मन भाषेचे ज्ञान देण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय संधींच्या दृष्टीने हे पुण्यात स्थापन झालेले कौशल्य विकास केंद्र महत्त्वाचे पाऊल आहे. भारत सर्वाधिक तरुणांचा देश असून आपल्या देशाने आपल्या कामाच्या माध्यमातून जगाची सेवा केली पाहिजे. त्यासाठी तेथील मागणीच्या अनुषंगाने कौशल्ये घेऊन तेथे सेवा बजावण्यासाठी जाणे गरजेचे आहे. आपल्याला राज्याची संस्कृती, आपली आदरातिथ्याची संस्कृती परदेशात पोहोचविण्याची ही चांगली संधी आहे.
विद्यार्थ्यांना कौशल्यांचे प्रशिक्षण देताना त्याबाबतची काही मानके निश्चित करणे गरजेचे आहे. ज्या देशात जायचे आहे त्या देशाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. गोएथे संस्थेबरोबर जर्मन भाषा प्रशिक्षणाच्या दृष्टीने करार करुन भाषा प्रशिक्षणाला गती देण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील कौशल्याधारित मनुष्यबळाची मागणी असल्याने शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून या कार्यक्रमाला गती देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत युवकांना कौशल्य प्रशिक्षण, भाषेचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून पारपत्र, व्हिसा तसेच परदेशात जाणे, तेथे स्थीरस्थावर होण्याच्या दृष्टीने सर्व सहकार्य केले जाणार आहे, असेही श्री. केसरकर म्हणाले.
आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रामुळे येथील युवांना परदेशातील नोकरी, रोजगाराच्या अनेक संधी खुल्या होतील, असा विश्वास व्यक्त करुन डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहर आणि फ्रान्स, जर्मनी, जपान आदी देशांशी पुण्यातील नागरी संस्थांचे पहिल्यापासूनच चांगले संबंध आहेत. देशातील युवकांना परदेशात नोकरीसाठी पाठविताना काही वेळा संस्थांमार्फत त्यांची फसवणूक होत होती. मानवी तस्करीचाही प्रश्न निर्माण होत होता. मात्र, गेल्या काही वर्षात केंद्र शासनाने युवकांना परदेशात संधी देण्याबाबत आणि आता महाराष्ट्र शासनानेही जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार करुन पुढाकार घेतल्याने युवकांमध्ये विश्वास निर्माण होणार आहे.
अनेक देशांतील नागरिकांना भारतातील पर्यटनात रुची असते. तथापि, त्यांच्या भाषेत आणि सुरक्षित पर्यटनबाबत मागणी आहे. त्यासाठी परदेशातील महिलांकडून महिला गाईडची मागणी होत असून या संधीचा लाभ घेऊन महिलांनी परदेशी भाषा शिकून गाईड होण्याची संधी मिळवावी. लंडन, चीन, युरोप आदींमध्ये भारतीय खाद्यपदार्थांविषयी उत्सुकता आहे. योग, आयुर्वेदाचीही मागणी आहे. त्यामुळे अनेक देशांना समोर ठेऊन कौशल्य विकासाचे काम करावे लागेल. परदेशातील शिष्टाचारांचे शिक्षणही देणे आवश्यक आहे. याशिवाय जगातील खंडनिहाय बोलल्या जाणाऱ्या भाषांचे वर्गीकरण करुन मागणी असलेल्या भाषा शिकविल्या जाव्यात, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सुचविले.
संदीप सिंग कौरा म्हणाले, एनएसडीसीचे अनेक देशांशी सामंजस्य करार झाले असून येथील कौशल्यप्राप्त युवकांना परदेशात पाठविण्यासाठी सर्व सहकार्य एनएसडीसीमार्फत केले जाते. आज उद्घाटन झालेल्या केंद्रात फूट लॅब, ब्यूट अँड वेलनेस लॅब, लँग्वेज लर्निंग लॅब आदी लॅब स्थापन करण्यात आल्या आहेत. कँब्रीज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेंसमेंटच्या सहाय्याने येथे इंग्रजी भाषेचे आणि पुढे जर्मन सह इतर भाषांचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. मोहितकर यांनी प्रास्ताविक केले. एनएसडीसीचे नितीन कपूर यांनीही मनोगत व्यक्त केले.