मुंबई, दि. ३१ ऑगस्ट :
काँग्रेस पक्ष जे मुद्दे जाहीरनाम्यात घेते ते मुद्दे सरकार आल्यावर पूर्ण करण्याला प्राधान्य असते. याचा अनुभव ज्या ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आले आहे तेथील जनतेने घेतला आहेत. टिळक भवन येथे जाहीरनामा समितीने राज्यातील प्रमुख सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधून जाहीरनाम्यातील जनतेच्या मुद्द्यावर चर्चा केली. हि मिटिंग जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडली. जाहीरनामा समितीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत हे देखील सदस्य आहेत.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, काँग्रेस पक्षाची जाहीरनामा समिती हि महत्वाची समिती मानली जाते. जाहीरनामा समितीमधील आश्वासने पूर्ण करण्याला काँग्रेस पक्ष कायमच प्राधान्य देत असते. त्यामुळेच काँग्रेस हे जनतेचा विचार करणारे सरकार अशी ओळख निर्माण झाली आहे. काँग्रेसने सरकार असताना अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. ज्याचा फायदा आजही जनतेला होत आहे. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात यु पी ए चे सरकार असताना प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांची कमिटी केली होती. जी जाहीरनामा पूर्ण करण्याबाबत धोरण राबवत असे. काँग्रेसने तेलंगणा, कर्नाटक या राज्यात जी आश्वासने जाहीरनाम्यात दिली होती ती पूर्ण करण्यावर काँग्रेस सरकारने प्राधान्य देत पूर्ण करीत आहे. हा फरक काँग्रेस सरकारचा व इतर पक्षांच्या सरकारचा आहे.
जाहीरनामा समिती राज्यात विभागवार मिटिंग घेऊन त्या त्या भागातील नागरिकांशी व सामाजिक संस्थांशी संवाद साधणार आहे. येत्या काही दिवसात समितीची मिटिंग पुणे व नागपूर येथे होणार असल्याची माहिती यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री सुरेश शेट्टी, प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उल्का महाजन, फिरोज मिठीबोरवाला, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, श्रीरंग बरगे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.