ABP गप्प का आहे ? उघडपणे घरात घुसून रात्रीतूनच मारून टाकण्याची धमकी देऊनही त्यावर गृहमंत्र्यांनी कारवाई ची हिंमत का नाही दाखविली ? नारायण राणेंनी अशी धमकी पोलिसांच्या समक्ष दिलेली चालत असेल तर अशा इतरांच्या हि धमक्या पोलिसांनी ऐकून घ्याव्या लागतील….?
ठाकरे गटाच्या नेत्याचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, कारवाई करण्याची केली मागणी
मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी या प्रकरणी मोदींकडे केली आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नुकताच कोसळला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गडावर जाऊन पुतळ्याची पाहणी केली होती. त्यावेळी ठाकरे गट व नारायण राणे यांचे समर्थक समोरासमोर आले होते. यावेळी झालेल्या वादात नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची खुली धमकी दिली होती. माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या या विधानावर हरकत नोंदवत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
राऊत काय म्हणाले आपल्या पत्रात?
विनायक राऊत आपल्या पत्रात म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. यानंतर सोमवारी 26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. या घटनेमुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेच्या मनात संतापाची लाट पसरली आहे.
याच पार्श्वभूमीवर 28 ऑगस्ट 2024 रोजी मालवण शहरात जनतेने स्वयंघोषित बंद पाळला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी आणि मी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. आदित्य ठाकरे आणि इतर उपस्थित वरिष्ठ नेत्यांबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना माहिती देण्यात आली होती. याचवेळी भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे आणि त्यांच्या काही गुंड समर्थकांनी तिथे पोहोचून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदार नारायण राणे यांनी घरात घुसून रात्रभर एकेकाला मारून टाकेन अशी धमकी उघडपणे दिली. सदर घटनेचे इत्यंभूत चित्रण वृत्तवाहिन्यांवर तसेच वृत्तपत्रांमध्ये आलेले आहे. सोबत वृत्तपत्रातील कात्रणे तसेच वृत्तवाहिन्यांच्या चित्रांच्या चित्रफिती पेन ड्राईव्हद्वारे आपल्याकडे सादर करीत आहे
खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाची गुंडगिरीची पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर अनेक दहशत, दादागिरी, खून असे गुन्हे या पूर्वीपासून दाखल आहेत. त्यांची दहशतवादी प्रवृत्ती आहे. तरी याबाबत सदरच्या जाहीर धमकीच्या अनुषंगाने खासदार नारायण राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी,त्यामुळे आपणास विनंती आहे की ही घटना अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. याकडे लक्ष देऊन खासदार नारायण राणे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून देशातील जनतेच्या मनात एक उत्तम व तत्पर प्रशासक म्हणून आपली प्रतिमा कायम राहील, असे विनायक राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.