पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे ग्रंथालय आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘किताबे कुछ कहती है ‘ या चर्चात्मक कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
शनिवार,दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम गांधी भवन(कोथरूड) येथे झाला.प्रसिद्ध लेखक दिवंगत चिं. वि. जोशी यांच्या ‘ आमचा पण गाव ‘ या पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात आली होता .सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख प्रा.श्रद्धा कुंभोजकर यांनी पुस्तकाची ओळख करून दिली . या उपक्रमाचे निमंत्रक ,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी ,समन्वयक प्रा.डॉ.शशिकला राय, अन्वर राजन,अप्पा अनारसे,अॅड.स्वप्नील तोंडे,कैलास यादव, तेजस भालेराव उपस्थित होते.
प्रा.श्रद्धा कुंभोजकर म्हणाल्या,’दुसऱ्या महायुद्धानंतर पावलांचे ठसे या पुस्तकात उमटले आहेत. त्या काळाचा इतिहास या पुस्तकात आढळून येतो. समकालीन अभ्यासाचे,घटनांचे विडंबन या पुस्तकात आहे.गावाविषयी आपल्या मनातील कल्पना आणि गंमतीशीर वस्तुस्थिती या पुस्तकातून दिसून येते.त्या काळातील व्यक्ती आणि समाज कसा होता, हे अभ्यासण्यासाठी अशी पुस्तके मदत करतात. केवळ युद्धामुळे सामान्य जन कसे भरडले जातात हे दिसून येते.या पुस्तकाद्वारे चिं. वि जोशी यांनी विविध प्रवृत्तींवर भाष्य केले आहे.
अन्वर राजन म्हणाले,’ भारतीय आणि पाश्चात्य साहित्याचे वाचन करणारे लेखक असतील आणि समकालिन घटनांवर भाष्य असेल तर पुस्तके चांगला दस्तावेज ठरतात .
डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ शहराकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले जुने गाव सुधारावे अशी इच्छा असते. पण, तशी उत्तरे सापडत नाहीत . ‘ आमचा पण गाव , ‘ गावगाडा’ सारखी पुस्तके उत्कृष्ट दस्तावेज ठरतात.
स्वप्नील तोंडे यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीला संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.