ऍड. राजेंद्र उमाप यांची माहिती; महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या वतीने आयोजन
पुणे: महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या वतीने राज्यस्तरीय वकील परिषद २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन उद्या रविवारी (ता. १) सकाळी १०.३० वाजता गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट पुणे येथे होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप यांनी दिली.
ऍड. राजेंद्र उमाप म्हणाले, “या परिषदेला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे, उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय, न्यायाधीश नितीन जामदार, के. आर. श्रीराम, रेवती मोहिते-डेरे, नितीन सांबरे, संदीप मारणे, अरिफ डॉक्टर, राज्याचे ऍडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ, गोव्याचे ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार मनन कुमार मिश्रा, उपाध्यक्ष एस. प्रभाकरन, पुण्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन आदी उपस्थित राहणार आहेत.”
“दिवंगत ऍड. विजयराव मोहिते व न्यायाधीश भीमराव नाईक यांना मरणोत्तर, तर डॉ. सुधाकर आव्हाड, ऍड. देविदास पांगम, ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. सुदीप पासबोला यांना ‘विधी महर्षी’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘वी द पीपल ऑफ इंडिया’ आणि ‘द स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन’ या पुस्तकांचे प्रकाशन, ज्येष्ठ वकिलांचा सन्मान, कायद्यातील नवीन बदलांवर चर्चासत्र होणार आहे. मॅट औरंगाबादचे अध्यक्ष न्यायमूर्ती पुखराज बोरा यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होणार आहे,” असे ऍड. राजेंद्र उमाप यांनी नमूद केले.