मुंबई-मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीचा उद्याचा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन करत महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा या घटकपक्षांना बुचकळ्यात टाकले आहे. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे ते म्हणालेत.
बदलापूर येथील एका शाळेत 4 वर्षांच्या 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीने उद्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. या बंदला वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर काही याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकांवर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने उद्याचा बंद बेकायदा असल्याचे स्पष्ट केले.
राज्यात कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. त्यानंतरही कुणी बंद पुकारण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा हायकोर्टाने या प्रकरणी दिला होता. कोर्टाच्या या आदेशानंतर महाविकास आघाडीच्या उद्याच्या बंदवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील आपल्या मित्रपक्षांना संविधानाचा मान राखत महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार शुक्रवारी सायंकाळी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते. शरद पवार यांच्या या आवाहनानंतर उद्धव ठाकरे व काँग्रेस कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार यांनी शुक्रवारी दुपारीच राज्यातील सर्वच घटकांना उद्याच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. शरद पवार म्हणाले होते की, बदलापूरच्या घटनेचा राग व्यक्त करण्यासाठी आम्ही संघर्षाची भूमिका घेण्याऐवजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद अत्यंत शांततेत पार पाडला जाईल. माझ्या पक्षाचे सर्वच सहकारी या बंदमध्ये सहभागी होतीलच. पण महाराष्ट्रातील सर्वच घटकांनी त्यात सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे.