पुणे- लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे केले शारिरीक शोषण करणाऱ्या रिक्षाचालकाविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर दुसऱ्या एका प्रकरणात अल्पवयीन मुलीवर तीन महिने बलात्कार करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
टेम्पोचालकाने एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार केला त्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलिसांनी या टेम्पोचालकाला अटक केली आहे.कार्तिक ऊर्फ मंगेश कांबळे (वय २३, रा. ढमाले वस्ती, कासारसाई) असे त्याचे नाव आहे. याबाबत या मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कासारसाई, चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे एप्रिल २०२४ ते जून २०२४ दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना कांबळे याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. याबाबत कोणास काही सांगितले तर तुला तुझ्या घरच्यांना जीवे मारुन टाकीन व आपल्या दोघात जे झाले आहे ते मी तुझ्या मित्र मैत्रिणींना सांगून तु फालतु आहेस, अशी बदनामी करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरुन या मुलीने कोणाला हा प्रकार सांगितला नाही. त्यामुळे त्याने वारंवार यामुलीला घेऊन जाऊन टेम्पोमध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यात ही मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेळके तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका प्रकरणात महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी एका रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. राकेश सुनिल सरोदे (वय ३१, रा. विश्रांतवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबत एका २५ वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दोन मुलांसह रहात आहे. त्यांचे पतीबरोबर कौटुंबिक न्यायालयात वाद सुरु आहे. फिर्यादी यांची २०२३ मध्ये राकेश सरोदे याच्याशी ओळख झाली. राकेश रिक्षाचालक असून त्याच्या रिक्षात बसून त्या गेल्या होत्या. त्यातून त्यांची ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली.त्यानंतर प्रेमसंबंधात रुपांतर झाले. त्याने आपलेही पत्नीबरोबर पटत नाही.
तिला घटस्फोट देणार असून आपण लग्न करु असे त्याने सांगितले.त्यानंतर १८ सप्टेबर २०२३ रोजी त्याने फिर्यादी यांना त्याच्या घरी नेले. तेथे त्यांच्याशी शारिरीक संबंध केला.पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर लग्न करु, असे सांगून त्याने वारंवार त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवले.१ ऑगस्ट रोजी याच कारणावरुन त्यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर त्याने संपर्क तोडला असून फिर्यादी यांची फसवणूक केली.पोलीस निरीक्षक कांचन जाधव तपास करीत आहेत.