पुणे, दि. 19: वस्तू खरेदी केल्यानंतर तसेच हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कॉफी दुकानात देयक तयार करताना ग्राहकांनी आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक नसून कोणीही आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश तावरे यांनी केले आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या २६ मे २०२३ रोजीच्या सुचनेप्रमाणे ग्राहकांनी शॉपिंग मॉल, किरकोळ व्यापाऱ्यांकडे वस्तू खरेदी केल्यानंतर तसेच हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कॉफीच्या दुकानात ग्राहकांनी सेवा घेतल्यानंतर शेवटी देयक तयार करताना भ्रमणध्वनी देणे बंधनकारक नाही.
माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ७२ अ अंतर्गत वस्तू विक्रीच्यावेळी मिळालेल्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा ग्राहकाच्या संमतीशिवाय इतरत्र वापर करणे ही व्यक्तीशी असलेल्या कायदेशीर कराराचा भंग आहे. ग्राहकाची वैयक्तिक माहिती उघड करणे हा दंडनीय गुन्हा आहे. असे केल्याने ग्राहकांचे नुकसान झाल्यास तीस वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा अथवा पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे, अशीही माहिती श्री. तावरे यांनी दिली.