अप्पा बळवंत चौकातील प्राथमिक शाळा आता माध्यमिक शाळेच्या प्रांगणात भरणार ; संस्थेतर्फे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत
पुणे : विद्यार्थ्यांवर होणारी पुष्पवृष्टी… पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर उमटलेले चिमुकल्यांच्या पायांचे ठसे…ढोल ताशांच्या गजरात सुगंधी अत्तर लावून मुलांचे केलेले स्वागत…आणि दररोज जिथे शाळा भरते, ती वास्तू सोडून नवीन वास्तूत जाण्याचा आनंद …असा भावस्पर्शी सोहळा बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला. अप्पा बळवंत चौकातील प्राथमिक शाळा आता १४१ वर्षे जुन्या माध्यमिक शाळेच्या वास्तूत भरणार आहे.
शिक्षण प्रसारक मंडळी संचलित नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने या आगळावेगळ्या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस. के. जैन, शाला समिती अध्यक्ष पराग ठाकूर, सुधीर काळकर, किरण शाळिग्राम, मिहिर प्रभुदेसाई, जया किराड, दामोदर भंडारी, सतीश पवार, अशोक वझे, प्राचार्य प्रकाश कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
ज्या वास्तूत प्राथमिक शाळा भरायची ती आता बाजीराव रस्त्यावरील वास्तूत शाळा भरणार आहे. जुन्या शाळेच्या वास्तुतून नवीन वास्तूत येण्याचा हा अविस्मरणीय प्रसंग डोळ्यात साठवत सरस्वतीच्या मंदिरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत झाले. जुन्या वास्तुसोबतचा स्नेह आठवत असताना मुलांसह शिक्षकांना ही दाटून आले. परंतु नवीन वास्तूत त्यांचे जल्लोषात झालेले स्वागत पाहून या वास्तूने आपल्याला सामावून घेतल्याचा आनंद त्यांच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या डोळ्यात दिसत होता.