मुंबई-काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या बीकेसी मध्ये होणाऱ्या सभेवर मुंबई वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला. त्यामुळे राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. तर त्या ऐवजी 20ऑगस्ट रोजी षण्मुखानंद सभागृहात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हे मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या यशानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी देखील जोरदार सुरू झालेली आहे. काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील बीकेसी मध्ये त्यांची सभा होणार आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्याआधीच त्यांची ही सभा वादात सापडली आहे.
माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी जयंतीनिमित्त २० ऑगस्टला मुंबईत काँग्रेसचा भव्य मेळावा:काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार व उध्दव ठाकरे उपस्थित राहणार
माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त २० ऑगस्टला मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दुपारी ३ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने या सभेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मात्र, आता यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई पोलिसांच्या या भूमिकेवर काँग्रेस पक्षाकडून टीका देखील केली गेली. तर मुंबई वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडे आपला आक्षेप नोंदवला असून मुंबई वाहतूक पोलिसांच्या या आक्षेपामुळे काँग्रेस देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच राहुल गांधी यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. आता 20 ऑगस्ट रोजी राहुल गांधी हे महाराष्ट्रात येणार नाही. तर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आक्षेप काय घेतला? राहुल गांधी यांची बीकेसीमध्ये 20 ऑगस्ट रोजी सभा होणार असल्याचे सांगितले गेले. मात्र सायन रेल्वे स्थानक रोडवरी ब्रिज बंद झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक बीकेसी मधून जात आहे. त्यामुळे आधीच बीकेसीमध्ये वाहतूक कोंडी वाढली आहे. वास्तविक सायन रेल्वे स्थानकावरील रोडवरील ब्रिजचे काम सुरू असून येथे नवीन पूल बांधण्यासाठी जुना पूल पाडण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी राहुल गांधी यांची सभा झाली तर मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी येथील सभेवर आक्षेप नोंदवला आहेत.