अमन कमरेशभाई हेमानीला केला गजाआड
पुणे-
समता सहकारी बँक नागपूर, या बँकेचे अध्यक्ष, उपाध्याक्ष, संचालक मंडळ, कर्जदार आरोपित व अमन हेमानी तसेच राजश्री हेमानी यांनी सन १९९७ ते २००७ या कालावधीमध्ये आपापसात संगनमत करून बँकेचे, बँक खातेदार व गुंतवणूकदार यांचे १४५.६० कोटी रुपयांचा अपहार केला. म्हणून एकूण ५७ आरोपी विरुद्ध सिताबर्डी पोलीस ठाणे, नागपूर गु.र.नं. ३३८/२००७ भा.द. वि. कलम ४०६, ४०८, ४०९, ४६७, ४६८, ४७१, ४२०, २०१, १२०(ब), १०९, ३४ सह एम पी आय डी कलम ३, ४ व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला. नमूद गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर येथे चालू आहे.
नमूद गुन्हयातील फरारी आरोपी नामे अमन कमरेशभाई हेमानी हा गुन्हा दाखल झाल्या पासून स्वतःचे अस्तित्व लपवून पुणे, मुंबई, नागपूर, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली येथे राहत होता. तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण व संपर्क क्रमांक बदलत होता. विविध शहरामध्ये त्याचे नातेवाईक, परिचित यांचेकडे सर्वोतोपरी शोध घेवूनही तो मिळून येत नव्हता. सदर आरोपी हा बँकेचा कर्जदार असताना त्याने समता बँकेकडून कोणत्याही प्रकारचे तारण सिक्युरीटी न देता बिल्स सूट सुविधा प्राप्त करून कर्जाची परतफेड न करता बँकेतील व्यवस्थापक व इतर यांना हाताशी धरून बँक खातेदार व गुंतवणूकदार यांची फसवणूक केलेली आहे. त्याच्या विरुद्ध मा. विशेष न्यायालयाने एनबीडब्ल्यू वॉरंट जारी करुन देखील नमुद आरोपी हा मा. न्यायालयात हजर न होता स्वतःचे अस्तित्व लपवून मागील १७ वर्षांपासून फरार होता.
फरारी आरोपींचा शोध घेणेकामी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक यांनी विशेष तपास पथक तयार केले आहे. नमूद पथकास फरार आरोपी अमन कमरेशभाई हेमानी, वय ५२ वर्ष हा हॉटेल न्यू अँन्ड, वसंत कुंज, या नवी दिल्ली मधील पंचतारांकित हॉटेलमध्ये काही दिवस वास्तव्य करत असलेची खात्रीलायक गोपनीय माहिती तांत्रिक विश्वेशनाद्वारे प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी प्राप्त माहितीद्वारे सापळा रचुन आरोपिस दिनांक १६/०८/२०२४ रोजी नमूद हॉटेलमधून शिताफीने ताब्यात घेऊन योग्य त्या कार्यावाहीस्तव गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर यांचे ताब्यात दिले आहे.
सदर कामगिरी ही अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक वैशाली माने,तांत्रिक यांचे नेतृत्वात सहा, पोलीस निरीक्षक प्रविण भोसले, पो.हवा. विकास कोळी, पो.हवा. सुनिल बनसोडे, पो.हवा. प्रदीप चव्हाण यांनी केलेली आहे.