सुडाचे राजकारण फडणवीसांनी सुरू केले,मोदींनी काँग्रेसच्या योजनांची नावे बदलली,महाराष्ट्रात पराभवाची भीती
मुंबई -चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही. मात्र पंतप्रधान मोदी वन नेशन, वन इलेक्शनची गोष्ट करतात असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच तीन घाशीराम कोतवाल यांच्या हातात महाराष्ट्र आहे असे म्हणत त्यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे.
नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार आले तर सर्व योजना बंद केल्या जातील असे विधान केले आहे. त्यावर संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, हे लोक असे कोण लागून गेले की त्यांच्या योजना आम्ही बंद करू?, आम्ही महाराष्ट्रावर कधी राज्य केले नाही का?, महाराष्ट्रात शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री होते. फडणवीसांनी महाराष्ट्रातील परंपरा समजणे गरजेचे आहे. ही योजना बंद, ती योजना बंद हे सुडाचे राजकारण फडणवीसांनी सुरू केले”,असे राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, ”राज्य जाईल अशी फडणवीसांना भीती आहे. म्हणून ते जनतेला धमकी देत आहेत. फडणवीसांची कारस्थाने महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे. चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाहीत. पंतप्रधान मोदींनीही नवीन कोणत्याच योजना आणलेल्या नाहीत. काँग्रेसच्याच योजनांची नावे बदलून त्यांनी योजना सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे सरकार जाणार असल्याने देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे. फडणवीसांच्या डर्टी पॉलिटिक्सचा अंत आता जवळ आलेला आहे”, असे राऊत म्हणाले.
तसेच पंतप्रधान मोदी यांच्या वन नेशन, वन इलेक्शनच्या घोषणेवरून निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ”मोदी लाल किल्ल्यावरून छाती ठोकून वन नेशन, वन इलेक्शनबाबत बोलतात. मात्र चार राज्यातील निवडणुका ते एकत्र घेऊ शकत नाहीत. जे सरकार चार राज्यातील निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन, वन इलेक्शनच्या गोष्टी करून खोटे बोलत आहेत. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये त्यांना पराभवाची भीती आहे. त्यामुळेच या दोन्ही राज्यात निवडणुकांसाठी त्यांना जास्त वेळ पाहिजे आहे. त्यासाठी सणवार किंवा इतर कारणे दिली जात आहेत”,असा आरोप राऊतांनी केला आहे.
तसेच ”सरकारला लाडकी बहीण योजनेमधून महिलांना लाच म्हणून हफ्ता द्यायचा आहे म्हणून निवडणूक घेतली जात नाही आहे. पंतप्रधान मोदी हे लाल किल्ल्यावरून खोटे बोलतात. तसेच लाडकी बहीण योजना हा महायुती सरकारसाठी टर्निग पॉईंट नव्हे तर यु- टर्न ठरेल. ही योजना म्हणजे नवीन क्रांती नव्हे. लोकांच्या घरातीलच पैसे ते देत आहेत. आमचे सरकार आल्यावर आम्ही १५०० मध्ये ३००० पर्यंतची वाढ करू”, असे आश्वासन राऊतांनी दिले आहे.