डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी, लोकशाहीसाठी समंजस संवाद यांच्यातर्फे आयोजन
शरणकुमार लिंबाळे, सुनीलकुमार लवटे, डॉ. विश्वास पाटील, डॉ. नागोराव कुंभार यांचा होणार सन्मान
पुणे: डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी आणि लोकशाहीसाठी समंजस संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानवंतांचा सत्कार’ सोहळा आयोजिला आहे. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, साहित्यिक, गांधी अभ्यासक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील आणि लेखक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार या चार ज्ञानवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील गांधी अध्यासन व राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा मंगळवार, दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता कमिन्स सभागृह, पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती संयोजक अरुण खोरे यांनी दिली.
अरुण खोरे म्हणाले, “डॉ. लिंबाळे मराठीतील अग्रणी लेखक, कवी आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सनातन, अक्करमाशी यासह कथा, कादंबरी, कविता आणि समीक्षा यांची ४४ हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमातून आपल्या आयुष्याची सुरुवात केलेल्या लवटे यांना कोल्हापुरात सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची भूमी गवसली. गांधीजी, विनोबा, साने गुरुजी आणि वि. स. खांडेकर यांच्या साहित्याचा आणि विचारांचा प्रभाव असलेल्या लवटे यांनी मराठी, हिंदीतून विपुल ग्रंथ लेखन केले आहे. गांधीजींचे विचार आणि त्यांचे चरित्र अनेक हिंदी ग्रंथातून लिहून डॉ. पाटील यांनी फार मोठे योगदान दिले आहे. मराठीतही त्यांनी विपुल लेखन केले आहे. गांधी साहित्याबद्दल त्यांना उत्तर प्रदेश सरकारचा विशेष पुरस्कार मिळाला होता. डॉ. कुंभार यांनी लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केलेले असून, सलग ३८ वर्षे ‘विचारशलाका’, या त्रैमासिकाच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधनाचे कार्य त्यांनी चालवले आहे.”