स्वप्न साकारण्यासाठी योग्य मार्गदर्शन, अथक परिश्रमांची गरज – रवीन नायर
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पिंपरी, पुणे (दि. १६ ऑगस्ट २०२४) – विद्यार्थ्यांनी पाहिलेले स्वप्न साकारण्यासाठी योग्य गुरु, मार्गदर्शक त्याचबरोबर अथक परिश्रमांची गरज असते. तरच भविष्यात आपली स्वप्न साकार होऊ शकतात. कोणत्या विषयाची आवड आहे, गती आहे हे ओळखून शिक्षण घेतले तर विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यासाठी पालकांनी मुलांचा शैक्षणिक कल ओळखून अभ्यासक्रम निवडला पाहिजे, असा सल्ला क्युएस आय-गेजचे सीओओ रवीन नायर यांनी विद्यार्थी व पालकांना दिला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या रावेत येथील एस.बी.पाटील पब्लिक स्कूल, मध्ये ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. यावेळी क्युएस आय-गेजच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक गुणवत्तेसाठी देण्यात येणारे डायमंड प्रमाणपत्र एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला प्रदान करण्यात आले. पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी जपानच्या एससीसीआयपीचे अध्यक्ष रेन्या किकुची, भारतीय रोबो कप ज्युनिअर फाऊंडेशनचे चेअरमन डेव्हिड प्रकाश, प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. देसाई यांनी एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांना दरवर्षी जपान मध्ये जाण्याची संधी प्राप्त झाली आहे, याविषयी माहिती दिली. तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या शैक्षणिक कार्य, पिंपरी-चिंचवड विद्यापीठातील विविध शैक्षणिक शाखांची माहिती दिली. एस.बी.पाटील पब्लिक स्कूल, २०१४ पासून सलग तिसऱ्यांदा एनएबीईटी – शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण या निकषावर उत्तरोत्तर वरची पातळी संपादन करण्यास यशस्वी झाली आहे. शाळेचे विद्यार्थ्यी शैक्षणिक व अभ्यासेतर क्रीडा, रोबोटिक, माहिती तंत्रज्ञान, आयडीया जनरेशन, चित्रकला, संगीत या विविध विषयांवरील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधून दमदार कामगिरी करत आहेत असे डॉ. देसाई यांनी सांगितले.
विविध गुणदर्शन कार्यक्रमात इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी दिव्या विसपुते हिने स्वातंत्र्य, मूल्य, न्याय, आत्मनिर्भरता तसेच प्रगतिशील भारत याबाबत माहिती दिली. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी आर्हा पुरोहित हिने ऑलम्पिक गेम्स विषयी माहिती दिली. भैरवी सरोदे हिला कथ्थक नृत्यातील कामगिरी आणि राबा मिडिया बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद घेऊन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
क्रांती कुलकर्णी, योगेश देवळे यांनी शाळा सजावट केली. सुलोचना पवार, रचना सिसोदिया यांनी सुत्रसंचलन केले. आभार दुर्गा भवानी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, पीटीए सदस्य, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.