मुंबई-भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर शरसंधान साधले. मनोज जरांगे यांनी परवा प्रवीण दरेकर यांना घरात घुसून पंखे तोडण्याची धमकी दिली. पण आता त्यांनी हिंमत असेल तर मुंबईत यावे. त्यांनी दुसऱ्यांना धमकावण्याचे उद्योगधंदे बंद करावेत. तसेच शरद पवार यांचा मुका घेणेही बंद करावे. असे ते म्हणालेत.प्रसाद लाड मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे किंवा आंदोलनाचे किती सन्मान करायचा याची एक वेळ असते. पण कुठेतरी थांबायचे असते. मनोज जरांगे पाटील वेळोवेळी एखाद्या गोष्टीचे राजकारण करून समाजकारणाला खड्ड्यात घालण्याचे काम करत असतील. देवेंद्र फडणवीस यांचा मुका घ्या किंवा त्यांना जे करायचे ते करा, मी पाहून घेईल असे म्हणत असतील, तर मी स्पष्टच सांगतो. आम्ही ज्या भागात लहानाचे मोठे झालो, ते हे धंदे करूनच मोठे झालो, असे ते म्हणाले.
मी यापूर्वी मनोज जरांगे यांना स्पष्टपणे, प्रामाणिकपणे व प्रेमाने सांगितले होते. त्यांनी हिंमत असेल तर राजकारणात यावे. राजकारणातील प्रश्न सोडवावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे प्रश्न सोडवावेत. पण ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये. ते यापुढेही अशी भाषा वापरणार असतील तर आम्ही त्यांच्या उत्तरापेक्षा घाणेरडे उत्तर देऊ. त्यांनी हे आपल्या डोक्यात ठेवावे, असे प्रसाद लाड म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांना न्याय नाकारला आहे. त्यामुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांची खुर्ची खेचण्याचा निर्णय घेतला आहे. 20 तारखेपर्यंत चित्र बदललेले असेल. देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार आहे. मला कुणीही हलक्यात घेऊ नये. कारण मी एकदा राजकारणात शिरलो तर परिणामांची चिंता करणार नाही, असे ते म्हणाले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आम्हाला राजकीय भाषेचा वापर करावा लागेल. माझी मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत शेवटची चर्चा झाली. त्यानंतर सरकारशी कोणतीही चर्चा झाली नाही. मी माझे आयुष्य आरक्षणासाठी पणाला लावेल. त्यांचा जीव खुर्चीत असून, आम्ही त्यांची खुर्चीच काढून घेऊ. त्यानंतर जे होईल ते होईल, असेही जरांगे पाटील महायुती सरकारवर निशाणा साधताना म्हणाले होते.