पुणे–उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मुले देव किंवा अल्लाहच्या कृपेने नाही तर नवऱ्याच्या कृपेने होत असल्याचे ठणकावून सांगत जनतेकडे छोटे कुटुंब ठेवण्याचा आग्रह धरला. कुटुंब छोटे ठेवले तर सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल. त्यांचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने करता येईल, असे ते म्हणाले.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे झाले. यावेळी आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी उपरोक्त विधान केले. ते म्हणाले की, सर्वच जाती-धर्माच्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की, मुलेबाळे देव किंवा अल्लाहच्या कृपेने नाही तर नवऱ्याच्या कृपेने होतात. त्यामुळे 2 अपत्यांवर थांबा. स्वतःचे कुटुंब छोटे ठेवले तर सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल. 2 मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांचा चांगला सांभाळ करता येईल. विशेषतः स्वतःचे जीवनही व्यवस्थित जगता येईल.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मला महाराष्ट्राचा कायापालट करुन दाखवयाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी, गृहमंत्री अमित शहा यांना सांगून केंद्र सरकारचा माेठा पैसा महाराष्ट्रात घेऊन आणयाचा आहे. चंद्रबाबू नायडू व नितीशकुमार यांनी ज्या प्रकारे अधिकाधिक निधी खेचून आला, अगदी त्याप्रमाणे मला निधी राज्याला मिळवून द्यायचा आहे. राज्याला जेवढा जास्त निधी मिळेल तेवढा जास्त विकास करता येईल. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार सुनील शेळके, बापू भेगडे, गणेश खांडगे, गणेश काकडे, संताेष भेगडे उपस्थित हाेते.
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही जनसन्मान यात्रा सुरु केली. त्याला उत्सर्फुत प्रतिसाद मिळत आहे. महिलांचे एवढे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आम्हाला अनुभवयास येत आहे. गुप्तचर विभागाने मला एक निराेप दिला, तुमच्या जिवाला धाेका आहे. परंतु मी त्यांना सांगितले मी राज्यभरात फिरणार. माझ्या बहिणींनी ज्या राख्या बांधल्या ते माझे सुरक्षा कवच असल्याने मला काेणता धाेका पाेहचू शकत नाही. 30 ते 35 वर्षाच्या राजकीय जीवनात काही वाईट केले नाही. सरकार मध्ये असल्याने चांगल्या याेजना देऊ शकलाे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रथमच मावळात आमदार निवडून दिल्याने मागील 5 वर्षात 2 हजार 800 काेटींचा निधी मी मावळ तालुक्यास देऊ शकलाे. महिलांना सन्मानजनक हक्क मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण याेजना अंमलात आणली. परंतु, विराेधकांनी याबाबत अडथळे आणले. त्यांनी सत्तेत असताना काही दिले नाही. कसले राजकारण, टिका टिप्पणी विराेधक करत आहेत, असे अजित पवार म्हणाले.
महिलांचा अधिकार म्हणून आम्ही त्यांना याेजनेत सहभागी घेतले. महिलांचे बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात केली. 90 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. उद्या हा आकडा सव्वाकाेटी पर्यंत जाणार आहे. अर्थसंकल्पात दाेन काेटी महिलांना पैसे देण्याचा आमचा संकल्प आहे. काहीजण सरकार पैसे काढून घेईल अशी अफवा पसरवतात. पण सरकार दिलेले पैसे परत घेणार नाही. भाऊ हा भाऊबीज हक्काने देताे, परंतु काहीजण चुकीचे वक्तव्य करतात. आम्ही महिलांच्या पाठिशी आहोत. ही याेजना पुढे 5 वर्ष चालू ठेवण्यासाठी महायुती सरकारला पुन्हा निवडून द्या, असे अजित पवार म्हणाले.