मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी यासंबंधी आपल्या मित्र पक्षांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले.मविआतील काँग्रेस व शरद पवारांच्या पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला तरी माझी हरकत नाही. त्याला मी येथेच पाठिंबा जाहीर करतो. कारण, ही निवडणूक महाराष्ट्राची अस्मिता जपणारी असून, कोणत्याही स्थितीत महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचायचे हाच आमचा निर्धार आहे, असे ते म्हणालेत.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याद्वारे महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांत मुख्यमंत्रीपदावरून कोणतीही रस्सीखेच सुरू नसल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा. मी येथेच त्याला पाठिंबा जाहीर करतो. कारण आताची लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी आहे. महाविकास आघाडी आजपासून पुढल्या लढाईला सुरुवात करेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. होऊ द्या घोषणा. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. आपण लोकसभेला राजकीय शत्रूला पाणी पाजली. लोकसभेची निवडणूक संविधानाची रक्षणाची होती. लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती.
आताची लढाई महाराष्ट्रधर्म रक्षणाची नाही. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान व महाराष्ट्राची संस्कृती जपण्याची आहे. जे महाराष्ट्र लुटण्यास आलेत. आता एक तर तू राहशील किंवा मी राहील या जिद्दीने आपल्याला ही लढायची आहे. होऊन जाऊ द्या. पण ही स्थिती आपल्या मित्रपक्षांत उद्भवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मला उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, पण यांना खाली खेचू या निर्धाराने आपल्याला पुढे जायचे आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण होणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. मी आज सर्वांपुढे स्वच्छपणे सांगतो. पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार हे नेते येथे उपस्थित आहेत. त्यांनी येथे आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा. त्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असेल. कारण, मुळात मी माझ्यासाठी लढतोय ही भावना माझ्यात नाही. ज्या क्षणी मी मुख्यमंत्रीपद सोडले, तेव्हापासून मी स्वार्थासाठी नव्हे तर माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढत आहे. आजपर्यंत महाराष्ट्राच्या झुकवण्याची जो हिंमत करतो, त्याला आम्ही गाडल्याशिवाय सोडणार नाही. या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्नच आमच्यापुढे नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी ठणकावून म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचीही आग्रही मागणी केली. आमची 30 वर्षे सेना – भाजप युतीत गेली. आमचेही जागावाटप व्हायचे. त्यात ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरत होते. पण आता मला त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री या धोरणाने आघाडीतच पाडापाडीचे राजकारण सुरू होते. यामुळे आघाडीला महत्त्व राहत नाही. त्यामुळे मला हे धोरण मान्य नाही. तुम्ही अगोदर चेहरा ठरवा व पुढे चला. माझी कोणतीही हरकत नाही. पण या धोरणाने पुढे जाऊ नका, असे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या मित्रपक्षांना उद्देशून म्हणाले.
अनेक सनदी अधिकारी आमच्याकडे लवकर येण्याची विनंती करत आहेत. कारण, ते अधिकारी महायुती सरकारच्या दडपशाहीला कंटाळलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः माझे ऐका नाही तर आपले दुसरे रुप दाखवण्याची धमकी देत आहेत. अरे तुमचे दुसरे रुप आहेच कोणते? गद्दार हेच त्यांचे खरे रुप आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आमचा सरन्यायाधीशांवर न्यायदेवतेवर विश्वास आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचा निर्णय पुढील येत्या 50-60 वर्षांत नक्की येईल अशी मला खात्री आहे. आम्ही तारीख मागितली तर कोर्ट आम्हाला आदेश देऊ नका असे सांगते. मग मी त्यांना हात जोडून सांगत आहे की, आम्हाला या जन्मात नाही तर पुढल्या जन्मात न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही.
सरन्यायाधीशांनी स्वातंत्र्यदिनी पत्रकारांशी बोलताना बांगलादेशामुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित झाल्याचे विधान केले. भारताने बांगलादेशाला स्वातंत्र्य केले आणि हे त्याच्यामुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित झाल्याचे म्हणत आहेत. बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरल्याने पंतप्रधान व सरन्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला. मग ही लोकशाही तुम्हाला परवडणार आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना उद्देशून केला.
आम्ही भूतकाळात डोकावल्यानंतर आम्हाला रामशास्त्री प्रभूने दिसतात. आजचा वर्तमान काळ उद्याचा भूतकाळ असेल. त्यामुळे भविष्यात केव्हा भूतकाळात डोकावण्याची वेळ आली तर राजकारणी म्हणून आम्ही काय केले व सरन्यायाधीश म्हणून तुम्ही काय केले याचे मूल्यमापन इतिहास करेल. कारण, आजची लढाईही सुद्धा लोकशाही वाचव्यासाठीचीच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.या मेळाव्याला शरद पवार, उद्धव ठाकरे,नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करतील. या मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीतीठरवली जाणार आहे.
महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख उद्धव ठाकरे असणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसने उद्धव ठाकरेंना महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्त्व ठाकरेंनी करावे असा प्रस्ताव काँग्रेसकडून देण्यात आला आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदावरुन भाजपची साथ सोडली. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानं ठाकरे सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते पुन्हा मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत. आपला मानस त्यांनी गेल्याच आठवड्यात केलेल्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेसच्या नेत्यांकडे व्यक्त केला. पण काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलेला नाही. याबद्दलचा निर्णय निकालानंतर घेतला जाईल, असं काँग्रेस नेतृत्त्वाकडून ठाकरेंना सांगण्यात आलं.