पुणे-वारंवार कारवाई करुन गावठी हातभट्टी दारु विक्री करणारा व परिसरात दहशत निर्माण करणार्या गावठी दारु विक्रेत्याला पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दीड वर्षाकरीता तडीपार केले आहे.
शामकांत विष्णु सातव (वय ३९, रा. आव्हाळवाडी रोड, डोमखेल वस्ती, वाघोली) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे.शामकांत सातव हा आव्हाळवाडी, वाघोली तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना वारंवार त्रास देत होता. बेकादेशीररित्या गावठी हातभट्टीची दारु विक्री करुन लोकांचे जीवन धोक्यात आणत होता. त्याच्यावर वारंवार कारवाई केल्यानंतरही तो गावठी दारु विक्री करत असत. सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा, या उद्देशाने सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे , पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय झुरुंगे , पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी अभिलेख तपासून शामकांत सातव याला तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडे पाठविला होता. शामकांत सातव याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून दीड वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.