पुणे, 15 ऑगस्ट 2024
पुण्यातील दक्षिण कमांडच्या मुख्यालयाने देशभक्तीच्या भावनेसह, राष्ट्राचा समृद्ध वारसा आणि सैनिकांचे शौर्य अधोरेखित करणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. याप्रसंगी सदर्न कमांडचे प्रमुख, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (अति विशिष्ट सेवा पदक प्राप्त) तसेच सर्व श्रेणीतील अधिकारी, जवान आणि माजी सैनिकांनी कमांड युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली
राष्ट्रीय एकात्मता आणि देशाभिमान दर्शविणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ मोहीमेचा भाग म्हणून 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात राष्ट्रध्वजाचे उत्साही प्रदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत, ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेवर आधारित सरकारच्या धोरणाअंतर्गत वृक्षारोपण मोहीम सुरू केली.
आर्मी कमांडर आणि इतर अधिकाऱ्यांनी पुण्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये रोपटे लावली. हे वृक्षारोपण हरित पृथ्वीसाठी भारतीय सैन्याची बांधिलकी दर्शवते. दक्षिण कमांडमधील लष्कराच्या तुकड्या, आणि आस्थापनांनी फळे देणारी तसेच औषधी वनस्पतींसह विविध प्रकारच्या एक लाखाहून अधिक रोपांची लागवड केली.
कारगिल विजय दिवसानिमित्त मुंबईतील कुलाबा येथून सुरू झालेल्या मोटारसायकल मोहिमेच्या ‘फ्लेगिंग इन’ समारंभाने या उत्सवाचा समारोप झाला. देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या मोहिमेने मुंबई ते कारगिल आणि पुढे पुणे असे विविध राज्यांतून 5500 किमीचे अंतर कापले आहे.