आमच्याकडे देना बँक आहे तर त्यांच्याकडे लेना बँक आहे
मुंबई- राज्यातील बहिणींना पैसे मिळू नये यासाठी सावत्र भाऊ प्रयत्न करत आहेत. त्यात खोडा घालत आहेत. त्यांना जोडा दाखवा, अशा प्रकारचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. लाडकी बहिण योजनेविरोधात हे कोर्टात देखील गेले होते. मात्र, न्यायालयाने देखील त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यांना चपराक दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
देणारे कोण आणि घेणारे कोण? या आमच्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माहिती आहे. आमच्याकडे देना बँक आहे तर त्यांच्याकडे लेना बँक आहे. आमच्या महाराष्ट्रातील महिला भगिनी सुज्ञ आहेत. हुशार आहेत. त्यांना सर्व गोष्टीची जाणीव असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. जे या योजनेत खोडा घालत आहेत त्यांना जोडा दाखवा, असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील महिलांना केले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सन्मान देण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. तर पैसे मिळू नये म्हणून सावत्र भावांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. विरोधकांच्या प्रचारावर राज्य सरकार देखील चांगलेच आक्रमक झाले आहे. विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देण्याचे काम सरकारच्या वतीने केले जात आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधकांना सावत्र भावाची उपमा देत राज्यातील महिला सरकारच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा दावा केला आहे.