रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना शासनाची भेट
राज्य शासनाने राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना आणल्या आहेत. राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वांवलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोच महिलांच्या सशक्तीकरणाला चालना तसेच विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाची गोड भेट म्हणून रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे होणाऱ्य राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना लाभ हस्तांतरणाबाबत शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे १७ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्यातील १५ हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधीक स्वरुपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्यावेळी लाभार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, बैठक व्यवस्था, पार्किंग, महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था, त्यांची आरोग्य तपासणी, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था आदी व्यवस्था योग्यप्रकारे होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
बहिणींना भेट देण्यासाठी यंत्रणेचे अविरत प्रयत्न
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी ३१ ऑगस्टअखेर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनावतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वचिंत राहणार नाही याकरीता जिल्हा प्रशासन अहोरात्र काम करीत आहेत. पात्र महिलांना विनाअडथळा अर्ज करता यावा, याकरीता ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या सूविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हा प्रशासन काम करीत आहे. अर्ज भरण्याकरीता पुणे महानगरपालिकेच्यावतीने १९३ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यातवीने १२३ सुविधा केंद्र सुरू करण्यात आले होते. ग्रामीण भागातदेखील अंगणवाडी ताईंच्या मदतीने अर्ज भरण्याची प्रक्रीया करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी वारंवार क्षेत्रनिहाय भेटी देऊन अर्ज सादर करतांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण केले. अर्ज भरण्याची मोहिम युद्धपातळीवर राबविण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी ठिकठिकाणी महिलांना अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन केले.
अर्जाच्या छाननीसाठी अहोरात्र झटले प्रशासन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात एकूण १ कोटी ५६ लाख ६१ हजार २०९ महिलांनी नोंदणी केली त्यापैकी राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात ९ लाख ७४ हजार ६६ महिलांनी नोंदणी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार सर्व तालुक्यात प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या अर्जांची छाननी हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान होते. सतत ५ दिवस तीन पाळ्यांमध्ये न थांबता छाननीचे काम पूर्ण करण्यात आले. रात्रीदेखील काम सुरू ठेवण्यात आले होते. राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचीदेखील माहितीच्या विश्लेषणासाठी मदत घेण्यात आली. सलग ५ दिवस अहोरात्र केल्यामुळे ९९.५४ टक्के अर्जांची छाननी करुन त्यावर निर्णय घेण्यात आला.
प्राप्त अर्जापैकी आंबेगाव तालुक्यात ३७ हजार ४६२, बारामती- ६६ हजार ६८५, भोर- २८ हजार ६३७, दौंड ५० हजार ८९५, हवेली- ३ लाख ३८ हजार ४१२, इंदापूर ६१ हजार ६१८, जुन्नर- ५८ हजार २६, खेड- ५२ हजार ५२०, मावळ- ४४ हजार ८१७, मुळशी- २६ हजार ५३, पुरंदर- ३७ हजार ४८२, शिरुर- ५६ हजार ६१३, वेल्हे ७ हजार ३४ आणि पुणे शहर ७१ हजार ४५३ असे एकूण ९ लाख ३७ हजार ७०७ महिला योजनेच्या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी ३ लाख ९६ हजार ८२५ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले होते. त्यापैकी ३ लाख ४३ हजार ५०० ऑनलाईन भरण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांबाबत गतीने कार्यवाही सुरू आहे.
प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ देण्याची प्रक्रिया लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. योजनेचा लाभ हस्तांतर करण्यासाठी महिलांचे बँकखाते आधार संलग्न करण्याची कार्यवाही प्रशासनाच्यावतीने सुरु असून सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महिलांनी आपले बँक खाते आधारशी संलग्न असल्याची खात्री करावी. अर्जातील त्रुटींची पूर्तता केल्यानंतरही महिलांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबतच राज्यात महिलांचे जीवनमान उंचविण्याकरीता महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’योजना, महिलांना वर्षातून ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे महिलांचा सर्वागिण विकास होण्यास मदत होणार आहे.
डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ हस्तांतरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता पुणे जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना सर्वप्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देतानाच त्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ देण्यात येईल.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे