” दिवसभर आज पाऊस सुद्धा दडी मारून बसला होता, आता हवा तेवढा पडला तरी चालेल.” असं मनोमनी सर्वांनाच वाटत होतं. रडे पाडा शाळेतून निघालो आणि पाहतो तर काय आभाळ भरून आलं होतं. पावसाने कृपा केली म्हणूनच तर छत्री रंगविण्याची म्हणजेच ‘रंगीला पाऊस’ ही कार्यशाळा पार पडली. जून आणि जुलै महिन्यांत शैक्षणिक साहित्य वाटप करतो आणि मग पावसाळा सुरु झालेला असतोच म्हणून छत्री वाटपाचा आमचा उपक्रम ठरवला जातो. पण नुसतं छत्री वाटप करत नाहीत, तर तिला छान रंगवून पावसात भिजण्यासाठी सज्ज करतो.
यावेळी हा उपक्रम विक्रमगडमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून करायचे ठरले. पावसाचे दिवस असल्यामुळे खड्डयाखड्डयातून गाडी चालवत आणि प्रचंड ट्राफिकमध्ये अडकून आम्ही दहिसर ते विक्रमगड असा ५ तासांचा प्रवास करून सुकसाळे शाळेत पोहोचलो. नारायण भोये सर सतत आमच्या संपर्कात होते आणि आम्ही कुठपर्यंत पोहोचलो याची चौकशी करत होते. चित्रकार श्रीनिवास मुलांना रंगाची जादू छत्रीवर करून दाखवणार होता. मुलांच्या चेहऱ्यावर विलक्षण कुतूहल होते. छत्र्या, रंग आणि इतर साहित्य शाळेच्या स्टेजवर ठेवलं गेलं. मुलंही सर्व जमा झाली होती. सगळीकडे भांबावून पाहत होती. सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता…एवढ्या छत्र्या घेऊन ओमकार दादा आला आहे पण करायचं काय त्याचं. ओमकार दादाने मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली आणि बघताबघता सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले. आपल्याबरोबर आलेला श्री दादा तुम्हाला आज नवीन काहीतरी शिकवणार आहे…ओमकार बोलत होता आणि मुलांना आता हळूहळू कळू लागले होते. मुलांचा ताबा आता चित्रकार श्री म्हणजेच श्रीदादाने घेतला होता. मुलांना रंगात आणि बोलण्यात कसं गुंतवून ठेवायचं याची श्रीची अपनी अपनी एक स्टाईल आहे. श्री बोलत होता आणि मुलं मंत्रमुग्ध होऊन त्याचं ऐकत होती. ‘छत्री रंगविण्याआधी आपण सर्वांनी छत्री देवाची प्रार्थना करूया’ म्हटल्यावर सगळ्यांनी मनोभावे हात जोडले आणि श्री सांगेल तशी प्रार्थना करायला लागले. श्रीची छत्रीची प्रार्थना मात्र एकदम मजेशीर आणि भन्नाट होती. सगळ्या मुलांनीच काय पण आम्ही आणि शिक्षकांनी सुद्धा खूपच एन्जॉय केली. आता छत्री कशी रंगवायची याचे प्रात्यक्षिक श्री करून दाखविणार होता. सगळ्याच मुलांना एकत्र छत्री रंगविता येणार नाही, म्हणून पहिली ते चौथीच्या मुलांना शाळेच्या व्हरांड्यामध्ये बसावयास सांगितले. मग काय कोणी तळमजला तर कोणी पहिला मजला अशी आपली खिडकीची जागा पकडून बसले. सार्थक आणि भार्गव या दोन मुलांना छत्री धरून बसविण्यात आले. दोघेही मुकाट्याने छत्री घेऊन खाली जाऊन बसले. नक्की काय होणार हे कुणालाच माहीत नव्हतं आणि आता श्रीने छत्री कशा विविध प्रकारे रंगवता येईल हे दाखवायला सुरुवात केली. गमतीजमती करत, मुलांशी संवाद साधत श्री छत्री रंगवत होता. मुलं त्यात रंगून गेली होती. ओमकार दादाने छत्री गरगर फिरवली आणि श्रीने त्यावर रंगाची बरसात केली. श्री, छत्री आणि रंग रंगपंचमीचा खेळ होते, असं ते दृश्य होतं…आहाहा! आता आपल्याला पण अशी आपली छत्री रंगवायची असं कळल्यावर एक एक चेहरे आनंदाने फुलले. जिथे त्या मुलांना स्वतःची अशी मालकीची वस्तू क्वचितच मिळते तिथे एक अख्खी छत्री मिळणार आहे, ती रंगवायला सुद्धा मिळणार याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आतापर्यंत चित्रकलेच्या वहीची पाने आणि छोटे-मोठे तुकडे झालेले रंगीत खडूच केवळ हातात मिळत होते; त्यापलीकडे फॅब्रिक कलर, रोलर आणि ब्रशसुद्धा मिळणार होता. मोठ्या मुलांना छत्र्या देण्यात आल्या तर पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी भूषण दादा आणि जितू दादाने रेनकोट आणले होते. ६ जणांचे ग्रुप केले आणि छत्री रंगवायला सुरुवात झाली. एखाद्या मोठया छत्रीवर आपल्या मनातलं अवकाश मुलं साकारू लागली. कोणी पूर्ण छत्रीला रंगांनी रंगवून टाकले तर कोणी तन्मयतेने त्यावर उभ्या आडव्या, रेषांचे फटकारे दिलेत. कोणी नागमोडी वाट दाखवत निसर्ग साकारला. सुकसाळे शाळेतील मुलं छत्री रंगविण्यात रंगून गेली होती. मुलाच्या हाताची जादू पाहून आभाळाला सुद्धा भरून आलं होतं. हलकेच शिडकावा करून त्यानेही आनंद झाल्याचं मनोमन सांगितलं.
‘आमच्या शाळेत कधी येताय?’…टोपलेपाडाच्या भुसारा सरांचा फोन आला मग ओमकार व श्रीने तिकडे प्रयाण केले. आमच्यासोबत यावेळी भूषण दादा आणि जितू दादा सुद्धा आले होते. हे सर्व आनंदाचे क्षण भूषण दादा आपल्या कॅमेऱ्यात टिपत होता आणि जितू दादा तर मुलांना छत्री रंगविण्यात शिक्षकांसोबत मार्गदर्शन तसेच मदतही करत होता. दोघेही या कार्यशाळेचा आनंद घेत होती. भूषण दादा तर फोन वरून आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ कॉल करून प्रत्यक्ष कार्यशाळा कशी चालू आहे ते दाखवत होता. सुकसाळे शाळेतील पहिल्या बॅचच्या मुलांच्या छत्र्या रंगवून झाल्या होत्या आणि रंगीबेरंगी छत्र्यांनी शाळेचे अंगण दुथडी भरून गेले होते. मुलांचा आनंद आणि कार्यशाळेची मजा असा दुहेरी आनंद घेऊन आम्ही मुलांचा निरोप घेतला आणि रडे पाडाच्या शाळेत जाण्यासाठी निघालो. तोपर्यंत टोपले पाडाच्या मुलांच्या छत्र्या रंगविण्याचे काम सुरू झाले होते. भुसारा सरांनी त्याचे फोटो आम्हाला व्हाट्सअपवर पाठविले.
रडे पाडा अशीच एक वरई बुद्रुक शाळेसारखी रानावनातील शाळा. मुलं आणि सर आमची खूपच आतुरतेने वाट बघत होते. या शाळेला आम्ही पहिल्यांदाच भेट देत होतो आणि तेही रंगीला पाऊसच्या निमित्ताने. पहिली ते पाचवी असलेली ही शाळा. बरं का, मुलांच्या उंची एवढी तर छत्री होती! सगळ्या मुलांच्या हातात छत्री दिल्यावर सगळे मस्त एक एक पोज देऊन उभे राहिले. शाळेत झोपाळा, घरगुंडी होती आणि सभोवताली रान जे आता हिरवा गालिचा पांघरून होते. शाळेच्या मागच्या बाजूला शेतात काही माणसं चिखलात उभी राहून भाताची लावणी करत होती. एकदम परफेक्ट निर्सगचित्र असावं असा देखावा आम्ही अनुभवत होतो. ओमकारने मुलांशी गप्पा मारता मारता श्रीची ओळख करून दिली. श्रीने मग मुलांचा ताबा घेतला. कुणाच्या गालावर तर कुणाच्या नाकावर ब्रशने हलकासा रंग लावत, छत्री देवतेची डोळे मिटून प्रार्थना करत, छत्री रंगवायची कशी ते श्रीने दाखविले. रानावनात निसर्गाच्या सान्निघ्यात शिकणाऱ्या मुलांनी रंगाची बरसात छत्रीवर केली. काहींनी भाताची इवलीशी रोपं काढली तर काहींनी रानफुलं, काहींनी स्प्रे पेंटिंगची मजा अनुभवली. काही मुलं तर थोडी छत्री रंगवून झाली की मधेच एक झोका घेत होते, किंवा घसरगुंडी करत परत ब्रशने छत्री रंगवीत होते. ‘हसत खेळत शिका’ ही संकल्पना या शाळेत खऱ्या अर्थाने अनुभवता आली. आम्हालाही मोह आवरला नाही, आम्हीही लहान होऊन एक उंच झोका अनुभवला. शाळेचे शिक्षक मोरेश्वर ठाकरे सर सुद्धा आपली छत्री तल्लीन होऊन रंगवत होते, तर इकडे भूषणने मात्र आपल्या संस्थेचे ब्रीद वाक्य ‘लेट्स इमॅजिन टूगेदर’ हे लिहून सर्वांचे सहकार्य आहे, हे हाताचे ठसे रंगाने उमटवून आपल्या मनातील भावना छत्रीवर रंगविल्या. खरं तर शाळा ५ वाजता सुटली होती अन् आता जवळपास संध्याकाळचे ६.30 वाजले होते तरीही कुणालाच घरी जायची घाई नव्हती. शेवटी आम्हालाच निक्षून सांगावे लागले की आता शेवटची ५ मिनिटे उरली आहेत. सर्वांच्या छत्र्या रंगून पावसात भिजण्यासाठी तयार झाल्या. रानावनातील या रडे पाडा शाळेतील शिक्षक आणि मुलांचा निरोप घेऊन आम्ही निघालो.
पावसाने सुद्धा आम्हाला साथ दिली. तेव्हा मात्र सर्वांच्याच मनात आले की या मुलांच्या आणि आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी रंगीला होऊन पाऊस पडू दे…बरसू दे…!
लेखिका : पूर्णिमा नार्वेकर, दहिसर
पाऊस रंगीला रे…..
Date: