संभाजीराजेंविषयी केलेल्या विधानाचे पडसाद, स्वराज्य संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
मुंबई- शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर अचानक हा हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांमध्ये तीन कार्यकर्त्यांचा समावेश होता. आव्हाड यांच्या गाडीच्या मागेच पोलिसांची गाडी होती. मात्र हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला नंतर ते फरार झाले. जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांच्या विषयी वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा हल्लाबोल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर नुकताच हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर देखील हल्ला झाला. संभाजीराजे छत्रपती यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर स्वराज्य संघटनेने जितेंद्र आव्हाड यांना आधीच इशारा दिला होता. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.
राज्यात कायदा व सुवव्यवस्था आहे का नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी विचारला आहे. राज्यात गृहमंत्र्यांचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला जर एखाद्याचे वक्तव्य पटले नसेल तर त्यांच्याशी बोला, चर्चा करा. मात्र, अशा पद्धतीचा हल्ला करणे हे महाराष्ट्रात नवीन सुरू झाले असल्याचे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे देखील विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.
स्वराज्य संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी–संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती म्हणणे सोडून द्यावे. त्यांचे रक्त तपासण्याची गजर असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत स्वराज्य संघटनेच्या वतीने आव्हाड यांना इशारा देण्यात आला होता. त्या नंतर आता त्यांच्या गाडीवर देखील हल्ला करण्यात आला. तसेच या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटना घेत असल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.