पुणे, ३१: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नव युवामतदारांनी आपले नाव १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा स्वीप समन्वयक अर्चना तांबे यांनी केले आहे.
पुरंदर विधानसभाअंतर्गत भेकराईनगर येथील एसपी इन्फोसिटी कंपनी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, निवडणुक नायब तहसीलदार संतोष सानप, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
श्रीमती तांबे म्हणाल्या, आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अद्ययावत मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. यादृष्टीने जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
या मोहिमेअंतर्गत मयत अथवा स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळणे, नावामध्ये किंवा पत्त्यात दुरुस्ती करणे आदी कार्यवाही करण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने किंवा नजीकच्या मतदान केंद्रावर नाव नोंदणी करता येणार आहे. नवमतदार नावनोंदणीसाठी मतदारांनी अर्ज क्र. ६, मयत अथवा स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळण्याकरीता अर्ज क्र.७, आणि नावामध्ये किंवा पत्यामध्ये दुरुस्ती करण्याकरीता अर्ज क्र. ८ सादर करावा. नागरिकांनी व्होटर हेल्पलाईन अॅप डाऊनलोड करून मतदार यादीत नाव नोंदविता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने भेकराईनगर येथील या कार्यक्रमातएसपी इन्फोसिटी या कंपनीतील ४०० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याचप्रकारे चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्यावतीने केशवनगर आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्यावतीने बाजीराव रोड येथील सरस्वती मंदिर नाईट कॉलेज कॉमर्स व आर्ट्स, रास्ता पेठ येथील डॉ.सायरस पूनावाला जूनियर कॉलेज, नामदेव शिंपी सभागृह, के.सी.ठाकरे शाळा, नामदेव शिंपी सभागृह आदी ठिकाणी विशेष मतदार नावनोंदणी अभियान राबविण्यात आले.