केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय करियर सेवा (एनसीएस) पोर्टलने 30 जुलै 2024 रोजी 2 दशलक्ष वास्तव रिक्त पदे उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. ही कामगिरी देशातील विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या मागणारे आणि उपलब्ध रोजगार संधी यांच्यातील दरी भरून काढण्यासंदर्भात सदर मंचाची विस्तारत जाणारी भूमिका आणि परिणामकारकता अधोरेखित करते.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सततचे प्रयत्न तसेच नियोक्ते, औद्योगिक संस्था आणि कर्मचारीवर्गाची नेमणूक करणाऱ्या संस्था यांच्याशी नियमितपणे साधलेला संवाद यामुळे उमेदवारांची भर्ती करणाऱ्यांमध्ये एनसीएस पोर्टलची स्वीकारार्हता तसेच आकर्षण वाढत राहिले आहे.
एनसीएस पोर्टलच्या माध्यमातून रोजगारसंधींचा शोध आणि जुळवणी, करियरविषयक सल्ला तसेच व्यवसायसंबंधी मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रमांविषयी माहिती, अंतर्वासिता इत्यादी विषयांच्या संदर्भात रोजगाराशी संबंधित सेवा पुरवल्या जातात. हे पोर्टल नोकऱ्या शोधणारे, नियोक्ते, एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजेस (करियर केंद्रे), सल्लागार, प्रशिक्षण देणारे, शैक्षणिक संस्था तसेच नेमणूक करणाऱ्या संस्था यांसारख्या रोजगार क्षेत्रातील विविध भागधारकांना पाठबळ पुरवते.
नियोक्त्यांकडून थेट मागणी, रोजगार मेळावे तसेच खासगी क्षेत्रातील विविध रोजगारविषयक पोर्टल्सशी एपीआय समावेशन यांसह विविध मार्गांच्या माध्यमातून रिक्त जागांची एकत्रितपणे माहिती मिळवण्यासाठी एनसीएस पोर्टल हा नोकरीच्या शोधत असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा साधन स्त्रोत झाला आहे.
एनएससी पोर्टलवर विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत ज्यामध्ये वित्त आणि विमा क्षेत्र (14.7 लाख), कार्यान्वयन आणि मदत (1.08 लाख), इतर सेवा उपक्रम (0.75 लाख), उत्पादन (0.71 लाख), वाहतूक आणि साठवणूक (0.59 लाख), माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क सुविधा (0.58 लाख), शिक्षण (0.43 लाख), घाऊक आणि किरकोळ (0.25 लाख), आरोग्य (0.2 लाख) इ. यासह अनेक उद्योग क्षेत्रांचा समावेश आहे. रिक्त पदांची ही वैविध्यपूर्ण श्रेणी देशभरातील रोजगाराच्या गरजा आणि उद्योगांच्या मागण्यांचे विस्तृत पटल प्रतिबिंबित करते.
सध्याच्या बहुतांश नोकरीच्या संधी 12वी पर्यंतची शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), आणि पदविका धारक उमेदवारांसाठी योग्य आहेत. यासोबतच, उच्च शिक्षण किंवा इतर तज्ञ पात्रता असलेल्या व्यक्तींसाठी विशेष पदे देखील उपलब्ध आहेत. रिक्त पदांचे हे विस्तृत वर्गीकरण विविध कौशल्य स्तर आणि व्यावसायिक कौशल्ये पूर्ण करण्यासाठी एनएससी पोर्टल वचनबद्ध आहे, यावर प्रकाश टाकते.
या ऐतिहासिक कामगिरीतून, रोजगाराच्या संधी आणि करिअर विकासासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून, गतिशील आणि मजबूत श्रमिक बाजाराला चालना देण्यासाठी एनएससी पोर्टलचा वाढता प्रभाव दिसून येतो.
एनएससी पोर्टलमध्ये सुधारणा करण्याच्या आपल्या सततच्या प्रयत्ना अंतर्गत, कामगार आणि रोजगार मंत्रालय कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करून प्रगत तंत्रज्ञानासह एनएससी पोर्टलचे एनएससी 2.0 म्हणून अद्यतनीकरण करण्याच्या दिशेने काम करत आहे. यासोबतच, पोर्टल सर्व भागधारकांना, विशेषत: नोकरी शोधणारे आणि नियोक्ते यांना अधिक फायदे आणि वैशिष्ट्ये प्रदान करण्यास सक्षम बनेल.