अकोला विश्रामगृहाबाहेर आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर मिटकरी यांनी अकोल्यातील सिविल लाईन पोलिसात घटनेबाबत आपला जबाब नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसारच माझ्या हल्ला झाल्याचा दावा काल केला आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील झालेला हल्ला आणि त्यानंतर मनसैनिकांचा मृत्यू या सर्व प्रकरणावर आता राज्यातील राजकीय वातावरणात चांगलेच तापलेले दिसून येत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांचे अभय असल्याशिवाय हल्लेखोर परार राहू शकत नसल्याचा आरोपही आमदार मिटकरी यांनी केला आहे.
मुंबई-राज ठाकरे यांच्या आदेशानुसारच माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हल्ल्या मागचे मुख्य मास्टरमाईंड हे राज ठाकरेच असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या संदर्भात पोलिसात केलेल्या तक्रारीत देखील त्यांनी राज ठाकरे यांचे नाव घेतले आहे. माझी राज ठाकरेंवर बोलण्याची औकात नसेल तर राज ठाकरेंची तरी अजित पवारांवर बोलण्याची औकात आहे का? असा प्रश्नही मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. मनसैनिकाच्या मृत्यूला कर्णबाळा दुनबळे हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान अकोला येथे अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळन मिळाले आहे. या मृत्यू प्रकरणी अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली असून या मृत्यूसाठी मनसेचे पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
मनसेच्या पक्षप्रमुखांनी पुण्यामध्ये येऊन अजित दादांवर टीका केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून मी त्यांच्या टीकेला उत्तर दिले. माझ्या उत्तरात कुठेही त्यांचे नाव नव्हते. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर ओढून घेतले आणि त्यांनी हा राडा केला. त्यांच्या या राड्यामुळेच माझ्या तालुक्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मेंदू घुटण्यात आहे, अशा बावळट, निर्बुद्ध, वाईट लोकांसोबत ते वाद केल्यापेक्षा महाराष्ट्राचे हित ज्यामध्ये आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमचे नेते अजित दादांची भूमिका आहे. त्या दृष्टीने काम करायला हवे. त्यामुळे ज्यांना अक्कल नाही त्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नसल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
माझी लायकी राज साहेबांवर टीका करण्याची नाही, ठीक आहे. मग राज ठाकरे यांची लायकी आहे का अजित पवार यांच्यावर टीका करण्याची? असा प्रतिप्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. मनसैनिकांशी माझे पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. ते अशी कृती करूच शकत नव्हते. मात्र कर्णबाळा दुनबळे यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन येथील लोकांना चितावणी दिली. त्यामुळे सदरील प्रकरण घडले असल्याचे अमोल मिटकरी यांना म्हटले आहे.