पुणे, २२ जुलै, २०२४: नगर रोडच्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एक वैशिष्ट्यपूर्ण केस अत्यंत दुर्मिळ अशा रोगावर मात करत रुग्णांची बरे होण्याची जिद्द आणि प्रगत वैद्यकीय देखभालीची किमया यांचे उत्तम उदाहरण ठरली आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या, सांगलीतील २२ वर्षांच्या विद्यार्थिनीने सह्याद्रि हॉस्पिटलमधील उपचारांच्या साहाय्याने फायर्स (FIRES) अर्थात फेब्रइल इन्फेक्शन-रिलेटेड एपिलेप्सी सिंड्रोमविरोधातील प्राणघातक लढ्यामध्ये विजय मिळवला आहे. हा न्यूरॉलॉजिकल विकार अतिशय दुर्मिळ असून, सतत येणाऱ्या, गंभीर स्वरूपाच्या फिट्स हे या आजारचे मुख्य लक्षण आहे. मात्र अनेकदा या आजारचे निदान होणे अवघड असल्याने या विकारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे.
वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच कथक नृत्याची आवड देखील जोपासणाऱ्या या विद्यार्थिनीला अचानक फिट्स येऊ लागल्या, दिवसाला जवळपास ४० एपिलेप्टिक फिट्स इतके हे प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे तिचे अवघे आयुष्य ढवळून निघाले. सुरुवातीला ती उपचारांना काहीही प्रतिसाद देत नव्हती, पुण्यातील एका रुग्णालयात तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तब्येत खूपच गंभीर होती आणि ती बरी होईल की नाही याबद्दल सर्वांनाच शंका वाटत होती.
या रुग्णाची समस्या फ्लू किंवा सर्दी सारख्या सामान्य विषाणूजन्य संसर्गाने सुरू झाली. परंतु नंतर तिला झटके येण्यास सुरुवात झाली ज्यावर स्थानिक रुग्णालयास यशस्वी उपचार न करता आल्याने रुग्णाची परिस्थिती अधिकच बिघडू लागली. अखेरीस महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन तिच्या कुटुंबीयांनी तिला सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये हलवले. तिथे तिला न्यूरो आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. पुण्यातील नगर रोडवरील सह्याद्रि हॉस्पिटल्समधील न्यूरॉलॉजीचे डायरेक्टर डॉ नसली इच्छापोरीया यांच्या तज्ञ देखभालीखाली तिच्यावर उपचार सुरु झाले. संपूर्ण न्यूरोलॉजी टीमने तिच्या उपचार पद्धती सुधारण्यात आणि तीव्र करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
डॉ. इच्छापोरीया, यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या न्यूरोलॉजी आयसीयू टीमने, तिच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण केले. डॉ इच्छापोरीया म्हणाले, “अतिशय गंभीर अशा आजाराशी त्या मुलीने दिलेला लढा आणि स्वतःच्या पायावर उभी राहण्याची तिची जिद्द पाहताना आम्ही सर्वजण भारावून गेलो होतो.”
डॉक्टरांनी अतिशय कमी वेळात या स्थितीचे ‘FIRES (फेब्रिल इन्फेक्शन-संबंधित एपिलेप्सी सिंड्रोम)’ असे निदान केले आणि त्यावर योग्य उपचार सुरू केले. रुग्णास हाय-डेन्सिटी न्यूरो आयसीयू मध्ये दाखल करून इम्युनोग्लोबुलिन, हाय-डोस अँटीकॉनव्हलसंट्स आणि ऍनेस्थेटिक एजंट्सने उपचार केले गेले. परिस्थिती आटोकयास येण्यात सुमारे चार आठवडे लागले.
मात्र हळूहळू तिची तब्येत स्थिर झाली, फिट्स नियंत्रणात आल्या आणि ती मुलगी अखेर शुद्धीवर आली. व्हेंटिलेटर काढल्यावर तर तिला नवजीवन मिळाल्यासारखे झाले. ती चालू लागली आणि विशेष म्हणजे काही दिवसांत पुन्हा नृत्य देखील करू लागली. डॉ इच्छापोरीया पुढे म्हणाले, “आज तिला इतके सुंदर नृत्य करताना पाहून कोणालाच विश्वास बसणार नाही की ही मुलगी एका जीवघेण्या आजारवर मात करून इथवर पोचली आहे.”
आता ही मुलगी पुन्हा एकदा आत्मविश्वासाने आपल्या पायांवर उभी आहे, वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी कंबर कसून तयारी करत आहे, इतकेच नव्हे तर मिस इंडियाचा किताब जिंकण्याचे, कथक नृत्यामध्ये प्राविण्य मिळवण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील ती जिवापाड मेहनत करत आहे. फायर्सचे सर्वसामान्य पूर्वनिदान पाहता, तिची तब्येत बरी होणे ही एक वैद्यकीय जादूच म्हणता येईल.
या मुलीने सांगितले, “या अनुभवामुळे माझे अवघे आयुष्य बदलून गेले. डॉक्टर बनण्याची माझी इच्छा आता अधिकच तीव्र झाली आहे, इतकेच नव्हे तर जीवनातील प्रत्येक क्षण भरभरून जगणे मी शिकले आहे, हॉस्पिटल वॉर्ड असो किंवा नृत्य मंच, यापुढील माझे प्रत्येक पाऊल माझ्यासाठी अधिक अर्थपूर्ण असणार आहे.”
निरोगी आयुष्य पुन्हा मिळवण्याच्या संघर्षात या मुलीची खंबीर साथ देता आली याचा सह्याद्रि हॉस्पिटल्सला खूप अभिमान आहे. तिची साहसी वृत्ती आणि अढळ निर्धार यांचे कौतुक करताना डॉ इच्छापोरीया म्हणाले, “आमच्या रुग्णांची सुदृढ होण्याची जिद्द आणि त्यासाठी आमच्या वैद्यकीय टीमने केलेले अविरत प्रयत्न आणि समर्पण याचे उत्तम उदाहरण म्हणजे या मुलीची कहाणी आहे..”