पुणे-केंद्र सरकारमध्ये कृषीमंत्री असताना आणि महाराष्ट्रात सत्तेवर असताना शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काहीही केले नाहीच, उलट राज्याच्या विकासाला आणि सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचविण्याचीच भूमिका घेऊन महाराष्ट्राचे नुकसान केले. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असून त्यांनी गैरकारभाराला संस्थात्मक प्रतिष्ठा दिली, हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे घेऊन भाजपचे कार्यकर्ते आगामी काळात शहरातील प्रत्येक प्रभागात जागर करतील, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात केलेल्या अपप्रचारातील प्रत्येक मुद्द्याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या साक्षीने दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. युपीए सरकारच्या सत्ताकाळात पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले याचा पंचनामाही केला जाईल. पवार यांनी पुण्यातील कोणत्याही चौकात येऊन जाहीर चर्चा करावी असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. हिंमत असेल तर पवार यांनी या आव्हानास सामोरे जावे, अन्यथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सारा हिशेब उघड करतील व पक्षाचे कार्यकर्ते तो प्रत्येक प्रभागात पोहोचवतील असा इशाराही या पत्रकात श्री. घाटे यांनी दिला आहे.
दूध भुकटी आयात, साखर कारखान्यांच्या आयकराचा प्रश्न शरद पवारांमुळेच टांगणीवर राहिला असून आरक्षणाच्या मुद्द्यावरील शरद पवारांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही श्री. घाटे यांनी केला आहे.