–स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्रात म्हणजेच आमदार, खासदार असूनही या मेट्रोची अंमलबजावणी नाही
पुणे : पुणे मेट्रो सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. शहरातील मोजक्याच ठिकाणी मेट्रोची सुविधा आणि ती देखील अर्धवट स्थितीत सुरु करण्यात आली आहे. कारण या मार्गांवरील काही ठिकाणची कामे अजून पूर्णच झालेली नाहीयेत. तसेच स्वारगेट ते कात्रज सारख्या अतिशय महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या भागात मेट्रोची अजूनही प्रतिक्षाच आहे. मात्र यावर भाष्य करताना विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी मेट्रोला उशीर होण्याचे कारण पुणेकरच असल्याचा थेट आरोप केला आहे.
स्वारगेट ते कात्रज या मेट्रोबाबत मागील १० वर्षे फक्त चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अश्विनी नितीन कदम यांनी २०१३ मध्ये स्थायी समितीमध्ये स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव सर्वप्रथम मंजूर केला होता. मात्र, दुर्दैवाने अकरा वर्षे झाली तरी या मार्गिकेला मंजुरी मिळाली नसून पुणेकर या मेट्रोच्या प्रतीक्षेतच आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्रात म्हणजेच आमदार, खासदार हे सर्व सत्ताधारी पक्षाचे असूनही या मेट्रोची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. आणि आता स्वतःचा हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी पुणेकरांवरचं बोट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.
पहिल्यापासूनच पुण्याचे द्वार समजल्या जाणाऱ्या स्वारगेट ते कात्रज या मार्गावर नागरिकांची खूप गर्दी असते. याशिवाय शहरातील सर्वच ठिकाणी ‘ट्रॅफिक जॅम’च्या समस्येला तोंड देत असलेले नागरिक वैतागले आहेत. अशातच मेट्रोचा पहिला टप्पा असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानचा मेट्रोचा प्रवास लांबलेला आहे. त्यानंतर शहरात मेट्रोच्या जाळ्याचे विस्तारीकरण जलद गतीने करणे गरजेचे आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याऐवजी, मेट्रोच्या विलंबासाठी पुणेकरांना दोष देणं बरोबर आहे का? शिवाय शहरातील ट्रॅफिक आणि त्यामुळे पुणेकरांना सोसावा लागत असलेला त्रास सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येत नसावा. त्यामुळेच स्वारगेट ते कात्रज मार्गिकेसाठी पुणेकरांमुळे विलंब होत असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे.
तसेच पर्वतीच्या नागरिकांनी सलग तीन वेळा आ. माधुरी मिसाळ यांना निवडून देऊनही मेट्रोच्या विस्तारीकरणात होत असलेल्या विलंबासाठी पुणेकरांना दोषी धरणे कितपत योग्य आहे. इतकेच नाही तर, सत्त्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा हा कबुली जबाबच म्हणावा लागेल. शिवाय पुणेकरांना दोष देण्याच्या प्रकारामुळे आता आगामी निवडणुकीत चित्र नक्की कसे असेल, हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.