मुंबई-फडणवीस आमदार फोडण्याची भाषा करतात. मग त्यांनी चिंचुके देऊन आमदार फोडले का? आमदार फोडण्यासाठी त्यांनी पैसे कुठून आणले. अमित शहा यांना भष्टाचार चालत नसेल तर मग त्यांनी फडणवीसांची चौकशी करून त्यांना अटक करावी असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. पुण्यात रविवारी भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरच आज प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय राऊत आक्रमक झाले होते.
संजय राऊत यांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्याच्या अटकेची मागणी गृहमंत्री शहा यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले, ”आम्ही घाबरणारे नाहीत. भाजपचे सरकार सत्तेत असे पर्यंत आम्ही तुरुंगात राहायला तयार आहोत. फडणवीस आमदार फोडल्याची भाषा करतात. मात्र त्यांनी दहीभात, चिंचुके देऊन आमदार फोडले का? अमित शहांनी त्यांची चौकशी करून अटक केली पाहिजे. फडणवीसांनी किती पैसे देऊन आमदार फोडले? त्यांची चौकशी करा त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावा. आमदार फोडायला पैसे आणले कुठून? हे सर्व अमित शहांनी केले तरच त्यांना भष्टाचाराबाबत बोलण्याचा अधिकार आहे”, असे राऊत म्हणाले.पुढे राऊत यांनी अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या भष्टाचाराच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ”एका हरलेल्या आणि घाबरलेल्या नेत्याची ही विधाने आहेत. पुण्यात जे लोकं व्यासपीठावर आणि समोर बसले होते त्यांनी अमित शहा यांच्या शरद पवारांवरील वक्तव्यावर टाळ्या वाजवल्या. मला त्या सर्व श्रोत्यांची कीव येते. गुजरातचे व्यापारी नेते पुण्यात येऊन महाराष्ट्राचे अभिमान असलेले पवार, ठाकरे यांच्यावर वक्तव्ये करतात. ही विधाने म्हणजे त्यांच्या मनात महाराष्ट्राबाबत असलेल्या द्वेषाची फुटलेली उकळी आहे. शरद पवार यांच्यावर आरोप ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आज अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसतात. याबाबत अमित शहांना माहित नाही का? त्यांच्या बाजूला अशोक चव्हाणही होते. त्यांच्यावर अमित शहांनीच आरोप केले होते. शरद पवारांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार कृषी खात्यातील कामाबद्दल मोदी सरकारने दिला. पवारांचे बोट धरून आम्ही राजकारणात आलो असे मोदी म्हणाले होते. मात्र शहा आरोप करतात तर मोदी, शहा यांच्यात मतभेद झालेले दिसत आहेत”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
तसेच अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख अशी टीका केली होती. यावरूनही राऊत कडाडले आहेत. ”आम्ही जिन्ना फॅन्स क्लबमध्ये सामील नाहीत. पाकिस्तानात जाऊन जिन्ना यांच्या कबरीवर फुले उधळणारे आम्ही नाहीत. पाकिस्तानात नवाब शरीफ यांचा केक कापण्यात आणि खाण्यात आम्हाला इंटरेस्ट नव्हता. देशातील प्रखर राष्ट्रवादी मुस्लिमांची बाजू मांडण्यात चुकीचे काहीच नाही. महाराष्ट्रातील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. लोकसभा प्रचारातही अमित शहांनी आरोप केले. मात्र तरीही जनतेने त्यांचा पराभव केला. गुजरातच्या व्यापाऱ्यांना महाराष्ट्र लुटू देणार नाही हा संदेश जनतेने दिला आहे. त्याचा आक्रोश आज ते करत आहेत”, असे राऊत म्हणाले.
तसेच राऊत पुढे म्हणाले, ”गृहमंत्र्यांसमोर फडणवीस काय भाषा वापरात होते. महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा ही कोणती भाषा आहे? गृहमंत्र्यांच्या समोर ही भाषा ते वापरतात. महाराष्ट्र ही भाषा सहन करणार नाहीत. नागपुरात त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन ही भाषा करावी. मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल. हिंमत असेल तर ईडी, सीबीआय बाजूला ठेऊन या. आम्ही नव्हे तर तेच औरंगजेबाचे फॅन्स आहेत. त्यांना हिंदू- मुस्लिम दंगली घडवायचे आहेत. म्हणून त्यांच्या तोंडात औरंगजेब आहे”, असा पलटवार देखील राऊतांनी केला आहे.