मुंबई: मनोज जरांगेंच्या प्रत्युत्तराला प्रवीण दरेकरांनी पुन्हा ललकारले आहे ,आज गुरु पौर्णिमेचा मुहूर्त साधून देवेंद्र फडणवीस हेच माझे गुरु आहेत त्यांच्यावरील टीका आपण सहन करणार नसल्याचे म्हटले आहे.
प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे खालच्या पातळीवरील भाषा वापरत आहेत. पवारांना त्यांनी आरक्षणाबाबत विचारावं. ते ठाकरे आणि काँग्रेस पक्षाला मराठा आरक्षणाबाबत काही विचारत नाहीत. त्यांच्या आंदोलनातून राजकीय वास येत आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून तुम्ही कुणाला पाडायचं किंवा निवडून आणायचं याच प्लॅनिंग करताय. राजकीय भूमिका घ्यायची असल्यास मनोज जरांगे यांनी राजकारणात यावे. जरांगे यांनी राजकीय अजेंडा न राबवता मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मराठा आरक्षण आंदोलक आणि भाजपकडून वार पलटवार होत आहेत. काल आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर खोचक टीका केली होती. त्यावरुन मनोज जरांगे पाटील प्रवीण दरेकर यांना लक्ष्य केले. मराठा समाज सगळं उघड्या डोळ्याने बघतो आहे. दरेकर तू पदाचं आमिष दाखवून लोकांना फोडायला लागलाय. माझ्याविरोधात तुमचं अभियान पुन्हा सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात. दरेकर आणि आणखी दोन-चार लोकांनी माझ्या बदनामीसाठी मोहीम सुरु केली आहे. मराठा समाजातील अभ्यासक आणि समन्वयक फोडायचे आणि त्यांना माझ्याविरोधात बोलायला लावायचे, पत्रकार परिषदा घ्यायला सांगितले जात आहे. दरेकर हे ही सगळी सुत्रे हलवत आहेत. पण प्रवीण दरेकर यांच्यासोबत आमिषापोटी जाणाऱ्या मराठा समाजातील लोकांनी लक्षात ठेवावे की, उद्या तुम्हाला समाजाला सामोरे जायचे आहे. दरेकर हा वाटोळं करणारा माणूस आहे. तो देवेंद्र फडणवीस बस सांगतील तिथे बसतो, रात्रभर उभा राहा सांगितलं तर उभा राहतो, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.