जालना -सत्तेसाठी माजोरडेपणा दिसत आहे. गर्दी काय असते मुंबईत दाखवतो. फडणवीस सर्व घडवून आणत आहेत असा हल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मागणी मान्य होई पर्यंत उपोषणावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, ”मराठ्यांच्या मुलांना त्रास झाला की मला वेदना होतात म्हणून मी बोलतो. मी दरेकर यांच्याबद्दल काहीच बोललो नव्हतो. आम्ही दरेकर, प्रसाद लाड यांना भाऊच म्हणतो. मात्र महाराष्ट्राच्या लेकरांना प्रवेश घेतांना अडचणी येत आहेत. याला भंपकपणा म्हणतात का? मराठ्यांच्या लेकरांच्या जागी तुमच्या समाजाचे लेकरे असतील तर तुम्हाला कसे वाटले असते? आम्ही दरेकर यांचे नावही घेत नाही. मात्र त्यांनी मराठा समाजाच्या लेकरांचा अपमान केला. त्यामुळे तुम्ही जनतेच्या नजरेतून पडले आहात”, असे जरांगे म्हणाले.
तसेच गर्दी काय असते हे तुम्हाला मी मुंबईत दाखवतो. मुंबईत आम्ही येऊ तेव्हा गर्दी तुम्हाला दिसेल. तुम्ही मराठा समाजायच्या गर्दीला आव्हान देऊ नका. तुमच्यासारख्या नीच विचारांचा मी नाही. माझ्याकडून गर्दी हटली म्हणून मी योजनेला नावे ठेवली नाहीत. गोर गरिब मराठ्यांच्या महिलांना योजनेचा लाभ देत असल्याचा दावा दरेकरांनी केला. मात्र त्याच महिलांची लेकरांना आरक्षण देण्याची मागणी आहे. दरेकर साहेबांनी ते आरक्षण द्यावे… ही योजना म्हणजे जत्रेत रेवड्या वाटण्यासारखे आहे”, अशी टीका जरांगे यांनी केली.
तसेच ”या योजना म्हणजे निवडणुका समोर ठेवत केलेले नाटक आहे. हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस घडवून आणत आहेत. फडणवीसांपुढे शिंदे किंवा अजित पवार गटाचे काही चालत नाही. त्यातही भाजपचे नेते हे फडणवीसांच्याच सांगण्यावरून बोलतात हे आमच्या लक्षात आले आहे. दरेकर यांनी माझ्या विरोधात अभियान सुरू करणार असल्याचे सांगितले. मात्र क्रांती मोर्चा पडद्यामागे तुम्हीच संपवला. तुमच्यासोबत आणखी 7-8 जण होते. स्वार्थासाठीचे तुम्ही मारेकरी आहेत. फडणवीसांसाठी तुम्ही काय काय करता सर्व काही आम्हाला माहित आहे”, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे यांचा भंपकपणा आम्ही आता उघडा करणार असल्याचा इशारा भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी दिला होता. तसेच मी मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करून गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून त्यांना हवे ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मनोज जरांगेंना प्रेम दिले, पाठबळ दिले, पण आता त्यांच्या डोक्यातील राजकारणाचे भूत उतरवावे लागेल. ते आम्ही निश्चितपणे करू. मनोज जरांगेंना आता स्वतःची पब्लिसिटी महत्वाची वाटत आहे. गोरगरीब महिलांना, भाऊ-बहिणींना फायदा होतोय, त्यापेक्षा मी मोठा, मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे म्हणून लाडकी बहीण आणि भाऊ योजनेव ते फुटकळ आरोप ते करत आहेत. या योजनेतून मराठा समाजातील गरीब महिलांनाही मदत होणार आहे असे दरेकर म्हणाले होते.