मुंबई-मनोज जरांगे यांचा भंपकपणा आम्ही आता उघडा करणार असल्याचा इशारा भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी दिला. मी मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करून गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून त्यांना हवे ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मनोज जरांगेंना प्रेम दिले, पाठबळ दिले, पण आता त्यांच्या डोक्यातील राजकारणाचे भूत उतरवावे लागेल. ते आम्ही निश्चितपणे करू, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, मनोज जरांगेंना आता स्वतःची पब्लिसिटी महत्वाची वाटत आहे. गोरगरीब महिलांना, भाऊ-बहिणींना फायदा होतोय, त्यापेक्षा मी मोठा, मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे म्हणून लाडकी बहीण आणि भाऊ योजनेवर ते फुटकळ आरोप ते करत आहेत. या योजनेतून मराठा समाजातील गरीब महिलांनाही मदत होणार आहे. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपेक्षित, वंचित सर्व गरीब घटकांना न्याय मिळणारी ही योजना आहे. पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजत आहात की सर्व खड्ड्यात गेले तरी चालेल, पण रोज माझ्यावरच फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण असे त्यांना वाटत आहे. आता त्यांनी त्यातून बाहेर पडावे, असेही दरेकर म्हणाले.
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, माझ्यावर व प्रसाद लाड यांच्यावर त्यांनी टीका केली. मनोज जरांगे मराठा समाजाने गर्दी केली म्हणून तुम्ही पोपटपंची करत आहात. पण आम्ही गेली 15-20 वर्ष प्रत्यक्ष काम करत आहोत. पडद्यामागे आम्ही काय करतो हे सर्व मराठा संघटनांना विचारा. मुलांच्या परीक्षेचा, भरतीचा प्रश्न, पदोन्नती, अधिसंख्या यासाठी प्रविण दरेकरांनी पुढाकार घेतला आहे. तुम्हाला माहित नाही. जरा माहिती घेऊन बोलत जा.
पीएसआय मुलांचा प्रश्न होता तेव्हा मी स्वतः 600-700 पीएसना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेऊन मी जॉईंन करविले आहे. आपले अज्ञान आहे. जरांगे तुम्हाला कल्पना नसेल पण आम्ही मराठा समाजातील मुलांच्या नोकऱ्यांसाठी, स्वयंरोजगारासाठी सतत रचनात्मक काम करणारे आहोत. मराठा समाजाला भावनिक करून मलाच नेता बनायचे आहे, हे तुम्ही तुमची वक्तव्ये तपासा. मुख्य प्रश्नांऐवजी लाडक्या बहीण योजनेवर बोलायला लागला आहात.
अतुल बेनके कुणाला भेटले, भविष्यात काय होणार आहे असे सांगणारे आता तुम्ही राजकीय झालेत. तुम्हाला मुसलमानांचा कळवळा येतो. पुन्हा वंचितांच्या गोष्टी करणार, ओबीसी-धनगर समाजाच्या गोष्टी करणार. त्यांच्यातून आरक्षण हवे आणि त्यांच्या हनुवटीला हात लावायचा प्रयत्न करणार, असेही प्रवीण दरेकर यावेळी जरांगेंवर निशाणा साधताना म्हणाले.
प्रवीण दरेकर म्हणाले की, केवळ भावनिक वातावरण करून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम जरांगेंनी थांबवावे. आता गोधडीचे नवे नाटक. त्यात आम्ही टीका केल्यावर सुधारणा केलात. आता महाविकास आघाडीलाही गोधडी टाकण्यासाठी घेतले आहात. अशा प्रकारच्या नौटंकीने काही साध्य होणार नाही. कोणी लाथा मारत नाही. हे मायबाप सरकार दयाळू आहे. उलट ऊबदार पांघरूण गरीब समाजासाठी मग मराठ्यांसह सगळ्या समाजावर सरकार टाकत आहे. यामुळे तुमचा पोटशूळ उठला आहे. तुमची भुमिका आता राजकीय झाल्याचे लोकांना, मराठा समाजाला कळले आहे. यातून तुम्हाला वैफल्य आलेय त्यातून तुम्ही शिवराळ भाषा, टोकाची राजकीय भाषा बोलायला लागलात. तुमच्या आंदोलनाचा विषय भरकटला आहे. हे तमाम मराठा समाजाला दिसले आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी यावेळी मनोज जरांगेंवर निशाणा साधताना केली.