पुणे, दि. १९: खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींना महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीमार्फत (अमृत) राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रबोधिनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.
सन २०२४-२५ या वर्षासाठी ‘अमृत’ या संस्थेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीकरीता प्रोत्साहानपर अर्थसाहाय्य योजना, एआयआयएमएस, आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी या संस्थेत शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाहाय्य योजना, रोजगारक्षम कौशल्य विकास योजना, कृषी उद्योग प्रशिक्षण योजना, स्वयंरोजगार व उद्योजकतापासून विकास योजना, कृषी क्षेत्रात ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण योजना, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास योजना, सी-डॅक संस्थेमार्फत माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण योजना, व्यक्तिमत्व व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, उद्योजकांकरीता आर्थिक विकास योजना (व्याज परतावा योजना) यासारख्या योजना राबविण्यात येत आहेत.
या योजनांच्या लाभार्थी निकषाबाबत व ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची माहिती https://www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राज्यातील ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही शासकीय विभाग, यंत्रणा, महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा युवक-युवतींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री.जोशी यांनी केले आहे.
0000