दिंडोरीत झाले होते पिपाणीला मोठे मतदान
निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांच्या यादीतील पिपाणी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या होत्यात नाशिकसह सर्वच जागांवर 4 लाखांहून अधिक मतदान पिपाणीला पडले होते. विशेषतः सातारा लोकसभेत या चिन्हामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभवाचेही तोंड पहावे लागले होते. त्यातच लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला अवघ्या काही हजारांचे मताधिक्य असते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शरद पवार गटाने पिपाणी चिन्ह गोठवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.
दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांच्या पिपाणीला राज्यात सर्वाधिक तब्बल 1 लाख 3 हजार 632 मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसल्याची भावना व्यक्त करत हे चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या मागणीनुसार निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले. या मतदारसंघात 37 हजार मते अपक्ष उमेदवाराच्या ‘पिपाणी’ला पडली आहेत. शरद पवार गटाने लढवलेल्या 10 लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्हाने तब्बल 4 लाखांपेक्षा जास्त मते मिळवली. त्यामुळे विधानसभेला तुतारीसमोर पिपाणीचा धोका वाटल्याने शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे गेला होता. दिंडोरीत बाबू भगरे यांच्या पिपाणीला राज्यात सर्वाधिक तब्बल 1 लाख 3 हजार 632 मतं मिळाली. बीडमध्ये पिपाणीवर निवडणूक लढवलेल्या अशोक थोरात या उमेदवाराला 54 हजार 850 मतं मिळाली आहेत. बारामती मतदारसंघात सोयलशाह शेख या उमेदवारानं 14 हजार 917 मतं मिळवली.
लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते की, आम्ही भाषणात तुतारी चिन्हाचा प्रचार करत होतो. पण मतदारांमध्ये संभ्रम झाला. आम्ही यासदंर्भात निवडणूक आयोगाकडे मतदानापूर्वी तक्रार केली होती, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.