पंढरपुर-लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन देणाऱ्या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात केली आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा 8 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेखाली या योजना लपून गेल्यात मात्र या अर्थसंकल्पात योजना मांडलेल्या आहेत त्यांची आता सुरुवात करू .
अन्नपूर्णा योजनेद्वारे ३ सिलेंडर मोफत देण्यात येतील–लाडक्या भावांना स्टायपेंड
शहरातील राजर्षी शाहू महाराज मराठा भवनाचे भूमीपूजन आज करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदेशाही पगडी आणि तुळशीहार घालून मुख्यमंत्री शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. मराठा समाजासाठी पंढरपूर शहरात एक एकर जागेवर राजर्षी शाहू महाराज मराठा भवन उभारण्यात येणार आहे. यासाठी शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी दिला असून गरज पडल्यास अतिरिक्त १० कोटींचा निधी देऊ असे यावेळी शिंदे यांनी जाहीर केले. ते म्हणाले,’ राज्यातील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी महायुती सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. साडेसात एचपीपर्यंत कृषीपंपाला वीजबिल माफ केले आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. अन्नपूर्णा योजनेद्वारे ३ सिलेंडर मोफत देण्यात येतील. मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्यात येणार आहे.मुलांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे लाडक्या भावांना बारावीपर्यंत शिक्षण झाल्यास ६ हजार, डिप्लोमा झाल्यास ८ हजार आणि पदवी असल्यास १० हजार स्टायपेंडच्या स्वरूपात मिळणार आहेत, असे जाहीर केले. यंदाची वारी, स्वच्छ वारी निर्मल वारी, सुरक्षित वारी ठरावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर दर्शनरांग सुरू करण्यासाठी १०३ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तसेच दरवर्षी पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी हजार बेड्सचे रुग्णालय सुरू करणार, वारी संपल्यावर पंढरपूर येथे डीप क्लिन ड्राईव्ह सुरू करण्यात येईल. वारीत मुख्यमंत्री नव्हे तर पांडुरंगाचा सेवेकरी म्हणून सहभागी होत असल्याचे यावेळी नमूद केले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. दुसऱ्या कोणताही समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही लावता आम्ही हे करून दाखवले.असे ते म्हणाले यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार समाधान अवताडे, आमदार भरतशेठ गोगावले, अभिजित पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मराठा समाजाचे महेश साठे, नागेश भोसले, दीपक वारजेकर, महेश डोंगरे उपस्थित होते.