हप्ते न भरल्याने झाला बनावट कागदपत्रांचा पर्दाफाश
पुणे-फ्लॅटचे बनावट कागदपत्रे तयार करुन ते फायनान्स कंपनीकडे तारण ठेवून गृहकर्ज घेऊन 30 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या पती-पत्नीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनीच्याकेशवनगर मुंढवा येथील कार्यालयात घडला आहे.
याबाबत सय्यद कचरुद्दीन शेख (वय-32 रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश प्रकाश तनपुरे(वय-32), जयश्री गणेश तनपुरे (वय-28 दोघे रा. अजमेरा हाऊसिंग कॉम्प्लेक्स, पिंपरी) यांच्यावर आयपीसी 406, 420, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन नितीन भाईचंद तलाठी यांच्या नावावरपिंपरी चिंचवड येथे असलेला फ्लॅट खरेदी केल्याबाबत सहायक दुय्यम निबंधक कार्यालयऔंध येथे करारनामा दस्त करुन घेतला. त्या करनाम्याच्या आधारे बंधन बँकेकडून 34 लाख 96 हजार रुपयेगृहकर्ज घेतले. त्यानंतर करारनाम्याचा बनावट दस्त तयार करुन घेतला.
तो दस्त शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनीला देऊन 29 लाख 90 हजार रुपयांचे गृहकर्ज मंजूर करुन घेतले.
त्यानंतर आरोपींनी बनावट कागदपत्राच्या आधारे नितीन तलाठी यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड,पॅन कार्ड तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे नितीन तलाठी यांच्या नावावरपिंपरी चिंचवड येथील फेडरल बँकेत खाते उघडले. फिर्यादी यांच्या शुभम फायनान्स कंपनीकडूनमंजूर झालेल्या गृहकर्जाची रक्कम नितीन तलाठी यांच्या खात्यात जमा करुन घेऊन त्या रक्कमेचा अपहार केला.तसेच फायनान्स कंपनीचे हप्ते न भरता शुभम फायनान्स कंपनीची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.