रस्त्यांवरील पथारीवाल्यांची अतिक्रमणे लक्ष करून महापालिकेने दिशाभूल चालविली आहे- आबा बागुल
रस्तेच ज्यांनी बळकावून बांधकामे केलीत, पार्किंगच्या जागा ज्यांनी बळकावून हॉटेले चालविली त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष
पुणे-कॉंग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि,’ शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याआधी विकास आराखड्यात दर्शविलेल्या रस्त्यांची सद्यस्थिती काय याची पाहणी करून डीपीतील रस्ते रुंद केल्यास खऱ्याअर्थाने वाहतुकीचा प्रश्न सुटून पुणेकरांना दिलासा मिळेल. अन्यथा रस्त्यांवरील पथारीवाल्यांचे अतिक्रमणे हटविण्यामुळे गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होईल शिवाय बेरोजगारीचे प्रमाणही वाढेल. एकप्रकारे त्यांच्या पोटावर पाय देण्यासारखा हा प्रकार होईल. मुळात सद्यस्थितीत पालिकेचे अधिकारी – कर्मचारी वर्ग हप्ते घेऊन अतिक्रमणांना खतपाणी घालत असल्याचे यापूर्वीच सिद्ध झालेले आहे. त्यामुळे केवळ पथारीवाल्यांचे अतिक्रमणे हटवून शहराच्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. हे आपल्या निदर्शनास याआधीच आणून दिले आहे. जर खऱ्या अर्थाने शहराच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा असेल तर विकास आराखड्यात दर्शविलेले रस्त्यांचे रुंदीकरण करणे अनिवार्य आहे. टीडीआररूपाने मोबदला देऊन डीपीतील किती रस्ते प्रत्यक्षात ताब्यात आले आहेत व किती कागदोपत्री ताब्यात आले आहेत. याची शहानिशा करणे आवश्यक आहे. केवळ कागदोपत्री रस्ते ताब्यात असून उपयोग नाही तर ते प्रत्यक्षात पालिकेच्या ताब्यात येणे महत्वाचे आहे आणि त्या रस्त्यांचे रुंदीकरण केल्यास शहराच्या वाहतुकीचा प्रश्न निश्चित सुटेल. तसेच विकास आराखड्यात दर्शविलेले सर्व रस्ते ताब्यात घेऊन त्यांचे रुंदीकरण होत नाही, तोपर्यंत विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यांचे रुंदीकरण होईल या भरवश्यावर प्रशासनाकडून सरसकट बांधकाम परवानगी, वाढीव एफएसआय देणे तातडीने थांबवावे अन्यथा भविष्यात पुणेकरांना मृत्यूच्या खाईत लोटण्याचा हा प्रकारही गंभीर ठरेल. शिवाय वाहतुकीचा प्रश्नही आणखी जटील होईल. त्यामुळे केवळ पथारीवाल्यांचे अतिक्रमणे हटविल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटेल हा ठोस उपाय नाही तर विकास आराखड्यातील दर्शविलेल्या रस्त्यांची सद्यस्थिती काय याची पाहणी करून डीपीतील रस्ते प्राधान्याने रुंद करणे हाच शाश्वत उपाय आहे याची आपण नोंद घ्यावी. पाथारीवरील कारवाई मुळे शहरात बेरोजगारी वाढेल व गुंडगिरी वाढेल हे सर्व रोखण्यासाठी शहरात सुरु असलेली पथारीवाल्यांवरील कारवाई थांबवावी. व डीपीतील रस्ते रुंद करावेत असे आबा बागुल यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.