पुणे : ‘मी बोलताच त्याने हंबरडा फोडला… भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला…’ या आणि अशा काव्यरचना, मुक्तच्छंद, ओवी, पाळणा, गीत, गझल, पोवाडा, सुंबरान, अभंग (अखंड) यातून भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सव रंगला. देशभरातून आलेल्या दोनशेहून अधिक कवींनी सुमारे दहा तास आपल्या काव्यसुमनांची उधळण केली. तीन वर्षांच्या चिमुकलीपासून ते ऐंशी वर्षांच्या आजींपर्यंतचे कवी व कवयित्री यामध्ये सहभागी झाले.
कवी विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात नुकताच झाला. गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळसह राज्यातील दोनशेहून अधिक कवींनी सहभाग घेतला. वैविध्यपूर्ण काव्यप्रकार प्रभावीपणे सादर केले. सहभागी कवींना मानाची शाल, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात सुरु केलेल्या देशातील मुलींच्या पहिल्या शाळेबाबत जनजागृती करणारा प्रबोधनपर काव्यमहोत्सव पहिल्यांदाच झाला असल्याचे विजय वडवेराव यांनी नमूद केले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे श्रीमती सुगलाबाई, सौभाग्यवती रीना आणि कुमारी स्वरा वडवेराव या एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांमधील स्त्रीशक्तीचे प्रतिनिधित्व करणार्या महिलांच्या हस्ते पूजन करून महोत्सवाचा प्रारंभ झाला. सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथील वंशज दिलीप नेवसे, तसेच शेकडो कवींच्या साक्षीने विजय वडवेराव यांना ‘भिडेवाडाकार’ ही उपाधी बहाल करण्यात आली. सन्मानचिन्ह, मानपत्र, फुले पगडी आणि उपरणे देऊन त्यांना गौरविण्यात आले.
विजय वडवेराव म्हणाले, “पहिल्यांदा २०१२ मध्ये भिडेवाड्यात गेलो. तेथील दुरावस्था पाहून ‘भिडेवाडा बोलला’ या दीर्घकवीतेचे एकटाकी लेखन हातून घडले. त्यानंतर त्याच वास्तुमध्ये कविसंमेलन आयोजित केले. संपूर्ण देशाला स्त्रीमुक्ती आणि स्त्रीशिक्षणाची प्रेरणा देणार्या भिडेवाड्याच्या भग्नावस्थेविषयी समाजजागृतीसाठी कवितेच्या माध्यमातून वेळोवेळी विविध उपक्रम राबवून चळवळ उभी केली. त्यामुळे आजवर देश-विदेशात ‘भिडेवाडा’ यावर हजारो कविता लिहिल्या गेल्या. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, वस्ताद लहुजी साळवे, मुक्ता साळवे यांच्या योगदानाचा कवींनी अभ्यास केला.”
कविता काळे, डॉ. तेजस्विनी कदम, मीनाक्षी जगताप, प्रतिमा काळे, ॲड. उमाकांत अदमाने आणि सविता इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. विजय वडवेराव यांनी आभार मानले.
विजय वडवेराव यांचा ‘भिडेवाडाकार’ उपाधीने सन्मान
Date: